(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DSK Scam | डीएसकेंचे बंधू मकरंद कुलकर्णी पोलिसांच्या ताब्यात
डीएसके डेव्हलपर्सकडून पुण्यातील फुरसुंगी भागात ड्रीम सिटी उभारण्यात येणार होती. त्यासाठी जमीन खरेदी करताना डमी कंपन्यांच्या सहाय्याने डीएसकेंच्या नातेवाईकांना फायदा करून देण्यात आला होता.
पुणे : डीएसके घोटाळाप्रकरणी डी एस कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं आहे. मकरंद कुलकर्णी अमेरिकेत पळण्याच्या प्रयत्नात असताना विमानतळ कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं.
डीएसके घोटाळा प्रकरणात मकरंद कुलकर्णी देखील आरोपी आहेत. सध्या मकरंद यांचा ताबा पुणे पोलिसांकडे देण्यात आला आहे. मकरंद कुलकर्णी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस बजावली होती. त्यामुळे मकरंद कुलकर्णी मंगळवारी सकाळी अमेरिकेला जात अससाना मुंबई विमानतळावर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
डीएसके डेव्हलपर्सकडून पुण्यातील फुरसुंगी भागात ड्रीम सिटी उभारण्यात येणार होती. त्यासाठी जमीन खरेदी करताना डमी कंपन्यांच्या सहाय्याने डीएसकेंच्या नातेवाईकांना फायदा करून देण्यात आला होता. त्यामध्ये मकरंद कुलकर्णींचाही समावेश होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणी डी एस कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, मेहुणी, जावई आणि डीएसकेचे काही सहकारी तुरुंगात आहेत.
काय डीएसके घोटाळा?
डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात आणखी तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं होतं. डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.