Pune Accident Drone Shot: कातळधार धबधब्याजवळ झाला अपघात; बचावकार्याचा थरार ड्रोन कॅमेऱ्यात कैद
राजमाची किल्ल्याच्या मार्गावर एक भला मोठा कातळधार धबधबा आहे. रविवारी याच धबधब्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी सहा पर्यटकांचा ग्रुप आला होता. त्यातील सुप्रिया गवणे या तरुणीचं पाय निसरड्या दगडावरून घसरला.
Pune Accident Drone Shot: सह्यादीच्या (Sahyadri hills) पर्वत रांगेतील निसर्ग पर्यटकांना जितका आकर्षित करतो, तितकाच तो हलगर्जी पर्यटकांना संकटात आणणारा ही ठरतो. मग अशावेळी बचावकार्य (resque) ही तितकंच किचकट ही असतं. पुण्यातील लोणावळ्यालगतच्या घनदाट जंगलातील अशाच एका बचावकार्याचं थरार ड्रोन (drone camera) कॅमेऱ्यात कैद केला आहे.
राजमाची किल्ल्याच्या मार्गावर एक भला मोठा कातळधार धबधबा आहे. रविवारी याच धबधब्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी सहा पर्यटकांचा ग्रुप आला होता. त्यातील सुप्रिया गवणे या तरुणीचं पाय निसरड्या दगडावरून घसरला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही, पण या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला. तिथून पायी चालत गाडीजवळ येणं तिला शक्य नव्हतं अन तिचे सहकारी तितक्या ताकतीचे नव्हेत. तेंव्हाच दुसऱ्या ग्रुपसोबत लोणावळ्यातील शिवदुर्ग बचाव पथकातील सदस्या प्राजक्ता बनसोड त्याच धबधब्यावर उपस्थित होती.
तिने सर्व परिस्थिती पाहून पुढच्या मदतीसाठी शिवदुर्गच्या इतर सहकाऱ्यांना संपर्क साधला. पथकाने तातडीनं तयारी केली अन पुढच्या दीड तासांत पथक कातळधार धबधब्यावर पोहचलं. तिथं जागेवरचं जखमी अवस्थेतील तरुणीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र ती पायी चालू शकत नव्हती, म्हणून पथकाने स्ट्रेचर बाहेर काढलं. त्या स्ट्रेचर वर तरुणीला घेऊन, खडतर प्रवास सुरु झाला. घटनास्थळावरून आधी चढाई करायची होती. ती चढाई किती कठीण होती. त्यामुळं पहिल्याच टप्प्यात पथकाचा घामटा निघाला. हे दृष्य़ ड्रोनमध्ये कैद केलं आहे.
पुढच्या टप्प्यात एका बाजूला घनदाट झाडी अन दुसऱ्या बाजूला खोल दरी आवासून उभी होती. यातून ही वाट काढत शिवदुर्ग बचाव पथकाने सुप्रियाची सुटका केली. या बचावकार्यात रोहीत वर्तक, समिर जोशी, योगेश उंबरे, अमोल परचंड, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड, आनंद गावडे, राजेंद्र कडू, कुणाल कडू , अशोक उंबरे, प्राजक्ता बनसोड तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अनिल आंद्रे, तुषार सातकर, सचिन वाडेकर, यश वाडेकर आणि मुंबई ट्रेकरचे लियांडर वाझ, जोयेल विल्फ्रेड, सुशांत वायदंडे, जय सोनार यांनी मेहनत घेतली. तर ड्रोनच्या माध्यमातून बचावाचा हा थरार दक्ष काटकर यांनी चित्रित केला.