Daund Accident: ट्रकची दुचाकीला धडक, भीषण अपघातात पती, पत्नी अन् मुलाचा मृत्यू
दौंड तालुक्यातील पाटस-कुसेगाव मार्गावर पाटस हद्दीत भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.या भीषण अपघातात दुचाकीवरील पती,पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला आहे.
Daund Accident: दौंड तालुक्यातील (Daund) पाटस-कुसेगाव मार्गावर पाटस हद्दीत भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती, पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष सदाशिव साबळे ,रोहिणी संतोष साबळे ,गुरु संतोष साबळे ( पाटस ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने पाटस परिसरात शोककळा पसरली आहे.
पाटस ते कुसेगाव जाणाऱ्या रोडवर कारखान्याजवळ अपघात झाला आहे. एकाच घरातील आई वडील आणि मुलाचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. तिघेही कुसेगावकडून पाटसच्या दिशेने दुचाकीने जात होते. त्यावेळी पाठीमागून येणार्या ट्रकने त्यांना ठोस दिल्याने अपघात होऊन आई आणि वडिलांचा जागेवर मृत्यू झाला असून मुलाचा रुग्णालयात नेताच मृत्यू झाला आहे.
न पाटस -कुसेगाव मार्गावर अपघातांची संख्या वाढली
दौंड तालुक्यातील अष्टविनायक मार्ग हा वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळे मृत्यूचा स्पॉट होत आहे. मागील काही दिवसांपासून पाटस -कुसेगाव मार्गावर अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पाटस हद्दीत कालव्याच्या जवळ भीषण अपघात झाला. या अपघाताने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. माहीती मिळताच पाटस पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सगळ्या अपघाताचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
अपघाताचं सत्र सुरुच
काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील रावणगावमध्ये टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा सायंकाळी पाच वाजता अपघात झाला होता. यामध्ये पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाले होते. तर तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. जखमींना दौंड आणि भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला होता. यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या महिला या ट्रॉलीखाली सापडल्या होत्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊ पानसरे या दोन्ही सख्ख्या जावा होत्या आणि अश्विनी प्रमोद आटोळे या तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत टोमॅटोचे 70 ते 80 क्रेट यामध्ये होते. टोमॅटो घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या 32 व्या क्रमांकाच्या वितरिकेवरून निघाला होता.