पिंपरी चिंचवडमधील कोरोनाबाधित महिला पोहोचली थेट दुबईला; महापालिकेचा भोंगळ कारभार उघड
संबंधित महिलेने 11 जुलैला आदित्य बिर्ला रुग्णालयात कोविड 19 चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचा अहवाल 12 जुलैला पॉझिटिव्ह आला. पण कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याने तिने गृह विलगिकरणात
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील गृह विलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असलेली कोरोनाबाधित महिला थेट दुबईला पोहचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाला अजूनही कानोकान खबर नाही. मग आरोग्य विभागाच्या कार्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. सोसायटीने पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार देऊनही कोणतीच कारवाई अद्याप झालेली नाही.
संबंधित महिला पुनावळे येथील व्हिजन इंद्रमेघ सोसायटीत वास्तव्यास आहे. 11 जुलै या महिलेने आदित्य बिर्ला रुग्णालयात कोविड 19 चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचा अहवाल 12 जुलैला पॉझिटिव्ह आला. पण कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याने तिने गृह विलगिकरणात राहण्याची विनंती केली होती. ती विनंती महापालिकेच्या आरोग्य विभागाने मान्य केली. त्याचवेळी महापालिका आरोग्य विभागाने सोसायटी कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याचं रहिवाशांना सांगितलं. साहजिकच सर्व रहिवाशांना गृह विलगीकरणात राहणं गरजेचं झालं. सोसायटीचे सर्व सदस्य या नियमाचं काटेकोर पालन करत होते, इतकंच नव्हे तर संबंधित महिलेला आपुलीकने काही वस्तूही दिल्या जात होत्या. मात्र शुक्रवारी 17 जुलैच्या रात्री ही महिला मेडिकलमध्ये जाते सांगून बाहेर पडली. बराच वेळ झाला तरी ती परतली नाही.
मोबाईलवर फोन केला असता, तिने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर सोसायटी सदस्यांनी दुबईत असणाऱ्या पतीला विचारणा केली. तेव्हा ती घरातच झोपली आहे, असं सांगितलं. मग सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने तिच्या फ्लॅटचा दार ठोठावला तसेच इंटरकॉमवर फोनही केला. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सोसायटीने सीसीटीव्हीत पाहिले असता ही महिला दहाच्या सुमारास बाहेर गेल्याचं निदर्शनास आले. त्यावेळी संबंधित पती-पत्नीने थाप मारल्याचे स्पष्ट झाले.
दुसऱ्या दिवशी संबंधित महिलेने थेट शारजाह विमानतळावर कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट आल्याचा मेसेज सोसायटी सदस्यांना पाठवला. तेव्हा सोसायटी सदस्यांना मोठा धक्का बसला. मुळात अवघ्या सहा दिवसात ही महिला कोरोनामुक्त झाली असेल का? झाली असली तरी 14 दिवस तिने गृह विलगीकरणात राहणं बंधनकारक होतंच? मुंबई विमानतळावरून तिला विमानात कसा काय प्रवेश मिळाला असेल? शारजाह विमानतळावर तिचा अहवाल कोरोना निगेटिव्ह कसा काय आला? असे अनेक प्रश्न रहिवाशांना पडले होते.
सोसायटी कंटेन्मेंट झोनमध्ये असताना ती निघून गेली आणि रहिवाशी मात्र अद्याप ही कंटेन्मेंट झोनमध्येच आहेत. त्यामुळे सोसायटीच्या कमिटीने याबाबत महापालिका आरोग्य विभाग आणि हिंजवडी पोलिसांना रीतसर तक्रारही केली. 18 जुलैला दिलेल्या तक्रारींवर अद्याप कोणतीच पावलं उचलण्यात आलेली नाहीत. खरंतर गृह विलगिकरणात असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची आरोग्य विभागाकडून रोज माहिती घेतली जाते. पण या प्रकरणाने आरोग्य विभागाचा कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. तर हिंजवडी पोलिसांना याबाबत विचारणा केली असता त्यांनाही दोन दिवसांनी जाग आली. संबंधित महिलेने दुबईत असल्याची आणि विमानतळावर अहवाल कोरोना निगेटिव्ह आलायची माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाला दिली आहे, अशी माहिती हिंजवडी पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिली. पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही उद्याच गुन्हा दाखल करू असं म्हटलंय.