पिंपरी- चिंचवड : लॉकडाऊन 4.0 मध्ये शिथिलता मिळाल्याने रखडलेले विवाह सोहळे उरकण्यासाठी अनेकांनी पुण्यातील देवाच्या आळंदीकडे मोर्चे वळवलेत. सुमडीत दोन विवाहसोहळे ही इथं पार पडले. प्रशासनाने याप्रकरणी कठोर पावलं उचलली आणि गुन्हे दाखल केले. मग प्रशासनाने पुढचा संभाव्य धोका ओळखून इथं लग्न करायचं असेल तर एक अट टाकली आहे. यामुळे प्रेम विवाह करणारे अन आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची गोची झालीये. पण या अटीने इथल्या अर्थकारणाला मात्र खीळ बसणार आहे.


प्रेम विवाह, आंतरजातीय विवाह अन कमी खर्चात लग्न सोहळे पार पाडण्यासाठी पुण्यातील देवाच्या आळंदीला मोठी पसंती असते. पालखी आणि इतर सोहळे वगळता संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला येणाऱ्या वारकरी आणि भाविकांपेक्षा इथं विवाह सोहळ्यासाठी मोठी गर्दी असते. कुटुंबियांना अंधारात ठेऊन लग्न करणाऱ्यांची संख्या इथं लक्षणीय असते. मात्र लॉकडाऊन झाल्यापासून येथील विवाह सोहळ्यांना बंदी घालण्यात आली. तीन लॉकडाऊन संपले अन चौथ्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याची अफवा उठली. तेंव्हा सुमडीत दोन विवाहसोहळे पार पडले. प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब पडताच गुन्हे दाखल करण्यात आले आणि आळंदीमधील वर अथवा वधू असेल तरच, ते ही घराच्या अंगणात आणि फक्त 50 वऱ्हाडीच्या उपस्थित विवाह करण्याचे आदेश प्रशासनाने काढले.


आळंदीत पाचशेहून अधिक धर्मशाळा आणि मंगल कार्यलये आहेत. या धर्मशाळा आणि मंगल कार्यलयात लग्न सराईमध्ये रोज 1000 पेक्षा जास्त तर इतरवेळी रोज 150 ते 200 विवाह सोहळे पार पडतात. शासनाच्या नियमानुसार 50 वऱ्हाडीमध्ये हे कार्य पाडायचं म्हटलं तरी लग्न सराईत रोज 50 हजार पेक्षा जास्त तर इतरवेळी रोज 5 ते 10 हजार नागरिक येथं येऊ शकतात. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखणे कठीण होईल. हाच संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने विवाह सोहळ्याबाबत हा निर्णय घेतल्याची माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.


या विवाहसोहळ्यावर आळंदीचे 75 टक्के अर्थकारण अवलंबून आहे. यासाठी ज्ञानेश्वर मंगल कार्यालयाचे मालक राजाभाऊ चौधरी म्हणाले, शंभर वऱ्हाडीच्या उपस्थितीत होणाऱ्या लग्नाला 25 व्यक्तींना रोजगार मिळतो. यावरून मोठ्या लग्नासाठी किती व्यक्तींना रोजगार उपलब्ध होतो याचा अंदाज येतो. पण या निर्णयाने धर्मशाळा, मंगल कार्यालय, भडजी, केटरर्स, कासार, फुलवालेसह दहा हजार कामगारांना याचा फटका बसणार आहे. श्रीकृष्ण मंगल कार्यालयाचे मालक आणि भडजी गिरीश तुर्की म्हणतात की, चौथा लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आम्ही काही तारखा बुक केल्या होत्या. मात्र प्रशासनाने हे नवे निर्बंध घातले. जे कोरोनाच्या अनुषंगाने बरोबर देखील आहेत. पण जसं इतरांना सूट देण्यात आली तशाच नियमांत आम्हाला बसवण्याचा शासनाने प्रयत्न करावा. तर भक्ती केटरर्सचे मालक पांडुरंग कुटे ही चिंतेत आहेत. लग्न समारंभ पार पडताना त्यांना रोज सात-आठ हजार रुपये मिळायचे. पण तो गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे आणि आत्ता नवे निर्बंध घातल्याने कोरोना हद्दपार होईपर्यंत आमची उपासमार होणार आहे.


प्रशासनाच्या या निर्णयाने अर्थचक्राला खीळ बसणार आहे. हे अर्थचक्र पुन्हा फिरवणे गरजेचे आहेच पण ते फिरवताना आपण कोरोनाच्या चक्रव्यूहात अडकणार नाही याची काळजी ही घ्यायला हवीच. तेंव्हा गर्दी करून लगीनगाठ बांधताना आपली गाठ कोरोनाशी पडू देऊ नका.


संबंधित बातम्या :