मुंबई : कोरोनाची झळ आजच्या या लॉकडाऊन कालावधीमध्ये नव्या नात्यांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. नवीन लग्न झालेली जोडपी हनिमूननंतर प्रथमच जवळपास एक महिना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये 24 तास एकत्र राहात आहेत. या जोडप्यांसह मागील तीन ते सहा महिन्यांमध्ये ज्यांची लग्न झालेली आहेत, अशा सर्वांनीच या कालावधीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आत्ताच्या या नाजूक घडीमध्ये अशा काही विशेष कपल अॅक्टिव्हिटी केल्यामुळे पुढील वाद टाळता येऊ शकतात. पुढील वाद टाळण्यासाठी आणि नातं घट्ट राहण्यासाठी मॅरेज कोच लीना परांजपे यांनी सांगितलेल्या या पाच गोष्टी केल्या तर नक्कीच फायदा होईल.


1) गप्पांमधून एकमेकांशी संवाद साधा. आपल्या पार्टनरची मतं, बाजू मनमोकळेपणाने ऐका आणि आपली आवडनिवड सुद्धा त्याला योग्य शब्दांमध्ये शेअर करा, फक्त अशा वेळी बोलताना शब्दांची काळजी घ्या, बोलण्याने माणूस दुखावतो याकडे लक्ष द्या


2) कधीतरी उगाच थोडेसे शांत राहा, एकमेकांच्या हात हातात घेऊन बसलात तर एकमेकांना समजून घेण्यासाठी याची मदत होईल.


3) किचनमध्ये एकत्र वेळ घालवा, काही नवीन रेसिपी ट्राय करा, कराओके ट्रॅक लावून गाणी रेकॉर्ड करा, जर तुम्हाला गाता येत नसेल तर तुमचा जोडीदार गायील, याचा आनंद घ्या.


4) नाते नवीन आहे याचे भान ठेवा, आपल्या जोडीदाराची कोणासमोरही खिल्ली उडवू नका. अगदी आपल्या घरातील वडीलधाऱ्या समोरही जोडीदाराचा सन्मान करा


5) नात्यांमध्ये समजून घ्या, वेळ द्या, आणि एखाद्याच्या सवयीवरुन त्याला लगेच त्याच्याबद्दल आपले मत तयार करु नका.


या पाच गोष्टी तुम्हाला या नाजूक परिस्थितीत लग्न संभाळण्यासाठी मदतीला येतील आणि आठवड्याभरातच तुम्हाला त्याच्यामध्ये बदल दिसेल.



बहुतेक लग्नांमध्ये आजच्या मिलेनियम पिढीच्या जोडप्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवण्याची सवय आहे. त्यामुळे अर्ध्या दिवसापेक्षा अधिक काळ एकमेकांना सहन करणं आणि तेही इतके दिवस लॉकडाऊनमध्ये अगदी अवघड बनलेलं आहे. अर्थात काही अपवाद वगळता. लॉकडाऊनमधील नव्या नवलाईचे दोन आठवडे संपल्यानंतर आता मात्र या जोडप्यांना एकमेकांचा कंटाळा यायला सुरुवात झालेली आहे आणि यातून हळूहळू थोडेफार खटकेही उडायला लागलेले आहेत. यातून भांडणं, वाद होऊन संसाराचा पायाही पोखरायला सुरुवात झालेली आहे. हे या जोडप्यांना कळत नाही आहे. अशा या नाजूक परिस्थितीत होणारी भांडणं वाद-विवाद तक्रारी कशा हाताळायचा नेमकी काय काळजी घ्यायची आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे जाणून घेणे आवश्यक आहे.




1) आपल्या जोडीदाराला त्याची स्पेस द्या, पूर्णवेळ दोघे एकत्रच असतात यामध्ये यामध्ये निदान दिवसातले तीन ते चार तास स्वतःसाठी घालवणे गरजेचा आहे. यामध्ये स्वतःसाठी स्वतःमधील कला विकसित करा. ऑनलाईन कोर्सेस जॉईन करा. क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये लक्ष घाला. म्हणजे दोघांनाही स्पेस मिळेल.


2) दुर्लक्ष करा - वाद शोधून काढणे खूप सोपे आहे, पण दुर्लक्ष करणं कठीण आहे. आताची परिस्थिती खूप नाजूक आहे. अशा परिस्थितीत जितके घरामध्ये आनंदी क्षण निर्माण करता येतील आणि एकमेकांशी नातं घट्ट कसं करता येईल याची काळजी घ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन होणारा वाद टाळता येईल.


3) आपल्या जोडीदारावरील राग, रुसवा, तक्रार घालवण्यासाठी आपण शांत राहणं हे केव्हाही परिणामकारक असतं. आपणास जर चिडचिड केली तर भांडणाला कारण मिळतच. त्यामुळे शांत राहा.


4) समजूतदारपणा - लग्नामध्ये आणि लग्नानंतर संबंध व्यवस्थित ठेवण्यासाठी केवळ माझाच नाही, तर थोडं तुझं आणि थोडं माझं असं करुन आपले संबंध टिकून ठेवा.


नवीनच लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये सध्या एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा कालावधी जावा लागतो, मात्र मागील तीन ते सहा महिन्यांमध्ये ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना हा कालावधी मिळाला नाही. लग्न झालं तोपर्यंत देश लॉकडाऊन झाला आहे. अशा परिस्थितीत आपलं नातं, आपलं कुटुंब एकत्र टिकवून ठेवण्यासाठी दोघांनीही तितकेच प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्हाला आम्ही दिलेल्या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील. ट्राय करुन बघायला काही हरकत नाही .


प्रतिक्रिया


लीना परांजपे (मॅरेज कोच)
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. लग्नामुळे दोन व्यक्ती जवळ येतात आणि त्याच्यासोबत दोन परिवारही. अशा परिस्थितीमध्ये नवीन लग्न झालेली जोडपी असतात त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी काही कालावधी हा निश्चितच लागतो. तसा त्यांना वेळही द्यावा लागतो. मात्र सध्या संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांना त्यांच्या मताप्रमाणे वेळ आणि स्पेस मिळत नाही. अशामध्ये अनेक खटके उडताना दिसत आहेत. सध्याची परिस्थिती नाजूक आहे. या नाजूक परिस्थितीमध्ये ज्यांची नुकतीच लग्न झालेली आहेत, किंवा तीन ते सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेली आहेत अशा जोडप्यांन मध्ये होणाऱ्या भांडणामुळे भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ते टाळण्यासाठी त्यांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वरील गोष्टी केल्या तर त्यांचे जीवन आनंदी होईल.