सिंधुदुर्ग : कोकणात एप्रिल, मे महिन्यात लग्नसराईचा हंगाम असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात लग्नसराईचा हंगाम संपत चालल्यामुळे सावंतवाडीतील इन्सुली गावात शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ न देता अनोख्या पद्धतीने आपला विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला वधू-वरांच्या घरातील कोणीच उपस्थित नव्हते. फक्त नवरदेवाचा एक मित्र आणि भटजी मिळून अवघ्या चार जणांच्या उपस्थितीतच हा सोहळा संपन्न झाला. या विवाहितांची वरात दुचाकीवरुनचं दारात आली. दरम्यान या लग्न सोहळ्यापूर्वी दोन्ही विवाहितांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची परवानगी घेतली होती. यावेळी शासनाच्या नियमांचे पालन केल्यास विवाहाला आपली काहीच हरकत नसल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.


इन्सुली गावकरवाडी येथे राहणारा वर स्वप्नील नाईक आणि सातार्डा येथे राहणारी वधू रसिका पेडणेकर यांचा महिन्याभरापूर्वी लग्न सोहळा ठरला होता. या विवाहाला दोघांच्याही घरच्यांकडून संमती होती.  एप्रिल महिन्यात हा लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र अचानक कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे हा विवाह सोहळा रखडला होता.


त्यातच ऐन लग्नसराईचा हंगाम संपत चालल्यामुळे या वधूवरांनी शासनाच्या नियमांचे पालन करतात साध्या पद्धतीने विवाह करायचे ठरवले. दरम्यान या विवाहासाठी त्यांनी तहसीलदारांकडे परवानगी मागितली. यावेळी तहसीलदारांनी फक्त पाच माणसांच्या उपस्थित हा विवाह करण्यास हरकत नाही.


मात्र या विवाहादरम्यान शासनाने लॉकडाऊन काळात जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर वधू-वरांनी तहसीलदारांनी घातलेली अट मान्य करून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा सोहळा पार पडला.


यावेळी नवरदेवाचा मित्र हेमंत वागळे याने देखील या सोहळ्याला विशेष सहकार्य केले. बांदा येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात हा विवाह संपन्न झाला. यावेळी वधूवरांच्या दोन्ही कुटुंबीयांकडून तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.