त्रिसूत्रात बांधला गेलेला, सकारात्मक ऊर्जा देणारा काव्यसंग्रह; आश्लेषा महाजन
Chandankalika : पुण्यात आज 'चांदणकलिका' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आलं.
पुणे: शिक्षिका मीना साळुंके लिखित पहिल्या वहिल्या 'चांदणकलिका' काव्यसंग्रहाचे नुकतेच पुण्यात कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, 'इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुना' च्या विश्वस्त डॉ. मधुरा जोशी, सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री आश्लेषा महाजन यांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन झाले. त्यावेळी 'चांदणकलिका' हा त्रिसूत्रात बांधला गेलेला, सकारात्मक ऊर्जा देणारा काव्यसंग्रह असल्याचं आश्लेषा महाजन म्हणाल्या.
''उत्कट प्रेम, विरह ,स्त्रीत्वाचा वेध, जीवनाबद्दल सकारात्मकता जपणाऱ्या , सामाजिक भान असणाऱ्या आणि परकाया प्रवेश करणाऱ्या अलंकारांचा बडेजाव न करणाऱ्या साध्या ,सहज सुंदर कविता आहेत. पौराणिक व्यक्तिरेखा समोर ठेवून त्यांच्या मनातील भावनांचे आंदोलन टिपण्याचा प्रयत्न कवयित्री मीना साळुंके यांनी केलेला आहे ," असं आश्लेषा महाजन म्हणाल्या. 'या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण दवणे यांची प्रस्तावना लाभलेली आहे , हे या पुस्तकाचे थोर भाग्य होय' असेही त्या म्हणाल्या. वालचंद संचेती यांनी काव्यसंग्रहास भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच मीना साळुंके यांची विहीण असणाऱ्या डॉ. मधुरा जोशी यांनी मनोगतात काव्यसंग्रहाचे कौतुक करताना स्वतः लिहिलेली 'विहीण' ही कविता सादर केली आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. सायरस पूनावाला हायस्कूलच्या मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख, रसिक मित्रमंडळी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनीच काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे प्रभावी वाचन केले.
'चांदणकलिका' हे काव्यसंग्रह पुण्यातील सुप्रसिद्ध बुकगंगा डॉट कॉम पब्लिकेशनने प्रकाशित केलेले आहे. कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन मीना साळुंके आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पाडले.