पुण्यात प्रेयसीचा छळ करणाऱ्या उद्योगपतीच्या मुलाला अटक
परवीनच्या मैत्रिणीने मेसेज पाहिल्यानंतर तातडीने कोरेगाव पार्क पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी परवीनची सुखरुप सुटका केली आणि धनराज मोरारजीला अटक केली.
पुणे : महिनाभरापासून प्रियकरानं घरात अमानुष छळ करत डांबून ठेवलेल्या इराणी तरुणीची पोलिसांनी सुटका केली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला अटक केली आहे.
परवीन घेली असं 30 वर्षीय पीडित तरुणीचं नाव आहे. प्रियकर धनराज मोरारजीने मागील एक महिन्यापासून परवीनला आपल्या घरात कोंडून ठेवलं होतं. धनराज परवीनला प्रचंड मारहाणही करत होता. धनराज मोरारजी टेक्स्टाईल लिमिटेड या कंपनीचे मालक अरविंद मोरारजी यांचा मुलगा आणि सिनेअभिनेत्री नगमाचा सावत्र भाऊ आहे..
परवीनचा बाहेर कोणाशीही संपर्क होऊ नये म्हणून धनराजने परवीनचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला होता. त्यामुळे तिला बाहेर कोणाशीही संपर्क साधता येत नव्हता. तसेच तिचा पासपोर्टही काढून घेतला होता.
अखेर सोमवारी धनराज काही वेळ घरातून बाहेर गेल्यानंतर परवीनने मोबाईलमधून तिच्या इराणी मैत्रीणीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला. व्हॉट्सअॅप आणि टेक्स्ट मेसेज धनराज चेक करत असल्याने परवीनने इन्स्टाग्रामवर मैत्रिणीला मेसेज केला.
परवीनच्या मैत्रिणीने मेसेज पाहिल्यानंतर तातडीने कोरेगाव पार्क पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाल करत परवीनची सुखरुप सुटका केली आणि धनराज मोरारजीला अटक केली.
दरम्यानच्या काळात परवीनचा धनराजने अमानुष छळ केल्याचं तिच्याकडे पाहिल्यानंतर दिसून येत आहे. सततच्या मारहाणीमुळे परवीनला ओळखणही कठीण जातं होतं. मात्र धनराज परवीनशी असा का वागला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कोरेगाव पार्क पोलीस अधिक तपास करत आहेत.