(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतरचंही बिल आकारल्याचा आरोप; पिंपरीतील स्टार हॉस्पिटलविरोधात गुन्हा दाखल
यापूर्वी याच स्टार हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी हॉस्पिटल कर्मचाऱ्यासह तिघांना अटक करण्यात आलेली आहे.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील स्टार हॉस्पिटलचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. कोरोनाबाधित महिलेवर मृत्यूनंतरही स्टार हॉस्पिटलने उपचार सुरूच ठेवल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. निगडी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित वाघ यांचाही यात समावेश आहे.
तक्रारदाराची आई कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांना आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तब्येत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शन नातेवाईकांना आणायला सांगितले. ते इंजेक्शन विकत घेतानाही तक्रारदाराला अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागले. रुग्णालयातीलच काही कर्मचारी हा काळाबाजार करत असल्याचं तक्रारदाराला संशय होता. हा अनुभव गाठीशी असतानाच 24 ऑगस्टच्या रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी कोरोनाबाधित आईचा मृत्यू झाल्याची माहिती मुलाला देण्यात आली.
पण दुसऱ्या दिवशी पैसे स्वीकारताना 25 ऑगस्टचे ही बिल आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले. मुलाने आक्षेप घेतला तरी रुग्णालय प्रशासनाने जुमानले नाही. शेवटी मुलाने स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली. त्यानंतर अखेर याप्रकरणी निगडी पोलिसांत संचालक डॉ अमित वाघसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
यापूर्वी याच स्टार हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी हॉस्पिटल कर्मचाऱ्यासह तिघांना अटक करण्यात आलेली आहे. याच मृत महिलेच्या मुलाने स्टिंग ऑपरेशन करत रेमडेसिवीरच्या काळाबाजाराचा पर्दाफाश केला होता. आईसाठी इंजेक्शन घेताना जे भोगलं तेच मित्राबाबत घडत होतं. त्यामुळे मुलगा चांगलाच संतापला. मग त्याने स्टिंग करून रेमडेसिवीरचा काळाबाजार चव्हाट्यावर आणला. तर आता आईच्या मृत्यूनंतर त्याच हॉस्पिटलने आकरलेल्या पैशाबाबत कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा केल्याने अखेर गुन्हा दाखल झाला आहे. एबीपी माझाने स्टार हॉस्पिटलचे संचालक अमित वाघ यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही.
कोरोना काळात मास्क बनवणाऱ्या कंपन्यांची नफेखोरी; व्हीनस, मॅग्नम कंपन्यांचा तब्बल 200 कोटींंचा नफा