Shivsena UBT : उध्दव ठाकरेंना महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का! पुण्यातील पाच नगरसेवक भाजपाच्या वाटेवर; फडणवीसांची घेतली भेट
Uddhav Thackeray : पाच नगरसेवक देखील आता ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार असल्याने पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पुण्यातील पाच नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आहे. महापालिकेमध्ये 10 नगरसेवक हे शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे आहेत. शिवसेना फुटीनंतर त्यातील नाना भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली असतानाच येरवड्यातील अविनाश साळवे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या पक्षाचे आठ नगरसेवकच उरलेत. त्यातील पाच नगरसेवक देखील आता ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार असल्याने पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे व प्राची आल्हाट भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे.
महानगरपलिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का
महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आलं, त्यानंतर आता महानगर पलिकेच्या निवडणुकीआधी पुन्हा एकदा पुण्यात मोठा धक्का बसणार आहे. पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून, त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. 5 जानेवारीला मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीला मोठ्या प्रमाणावर साथ दिली, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं. अशातच मागील दोन - तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याचे संकेत मिळत आहेत. अशातच बदलाचे वारे दिसून येत आहे.
कोण आहेत ते नगरसेवक?
महापालिका निवडणुकींच्या अनुषंगाने भाजप व महायुतीतील इतर पक्षांमध्ये महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतील नेत्यांचे इनकमिंग होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेतून ही सुरूवात झाल्याचं चित्र आहे. विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, संगीता ठोसर हे पाच माजी नगरसेवक उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात धनवडे, ओसवाल यांनी आपल्या सोशल मिडियावरती सूचक पोस्ट शेअर केल्या आहेत. 5 जानेवारीला मुंबईमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती चर्चा आहे, दरम्यान या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऐन निवडणुकीआधी मोठा धक्का बसणार आहे.
या घडामोडीवरती शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे म्हणाले, "भाजपमध्ये जाणाऱ्या नगरसेवकांनी त्यांच्या कारकिर्दीत नेमकं काम केलं ते सांगावं. त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं नसल्यामुळेच त्यांना भाजपचा आसरा घेण्याची वेळ आली आहे."