Pune Senabhavan : पुण्यातील शिंदे गटाच्या सेना भवनाचं नाव ठरलं; नव्या वर्षात होणार उद्घाटन
मुंबईनंतर आता पुण्यातही शिंदे गटाचे सेनाभवन उभारणार आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात हे शिंदे गटाचं सेनाभवन होणार असून 'बाळासाहेब शिवसेना भवन' असं त्याचं नाव असणार आहे.
Pune Sena Bhavan : मुंबईनंतर आता पुण्यातही शिंदे गटाचं सेनाभवन उभारणार आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात हे शिंदे गटाचं (Eknath Shinde) सेनाभवन (Senabhavan) असणार आहे. 'बाळासाहेब शिवसेना भवन' असं पुण्यातील सेनाभवनाचं नाव असणार आहे. सध्या हे सेना भवन उभारण्यासाठी दिवस-रात्र काम सुरू आहे. या सेना भवनात कुठलीही कमतरता भासू नये, यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
साडेचार हजार स्क्वेअर फूट इतक्या जागेत हे भव्य कार्यालय असणार आहे. या कार्यालयात कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मोठा हॉलदेखील तयार करण्यात येणार आहे. शिवाय कॉन्फरन्स रूम, अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र केबीन देखील तयार करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे कार्यालय 24 तास खुलं असणार आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यभर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आता एकनाथ शिंदे गटाकडून वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यालय उभे करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आधी आमदार सदा सरवणकर यांनी मुंबईमध्ये दादर भागात प्रति सेनाभवन (Prati Shivsena Bhavan) उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुण्यात देखील मध्यवर्ती ठिकाणी प्रति शिवसेना भवन उभा करणार असल्याची घोषणा शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी केली होती. त्यानुसार या भव्य सेनाभवनाचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
'बाळासाहेब शिवसेना भवन' सेना भवनाचं नाव
पुण्यातील सेनाभवनाचं नाव बाळासाहेब शिवसेना भवन असं असणार आहे. काही दिवसांपासून शिवसेना कोणाची हा वाद सुरु होता. मात्र अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह आणि नाव तात्पुरतं गोठवलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलं आहे आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे बाळासाहेब शिवसेना भवन असं नाव ठेवण्यात येणार आहे.
मुंबईत होणारं काम पुण्यात होणार
पुण्यातील नागरिकांना आणि नेत्यांना काहीही काम असलं तर त्यासाठी मुंबईत वाऱ्या कराव्या लागत होत्या. महापालिकेच्या योजना केंद्र शासनाच्या योजना, महाराष्ट्र शासनाच्या योजना या सगळ्या संदर्भातील काम करण्यासाठी या आधी मुंबईला जावं लागत होतं. मात्र सेनाभवन झाल्यावर अनेक नेत्यांना किंवा नागरिकांना मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागणार नाही. त्यांच्या सगळ्या समस्यांचं निराकरण पुण्यातील सेनाभवनात होणार असल्याचं शिंदे गटाचे पुण्याचे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी सांगितलं आहे.
नव्या वर्षात नव्या सेनाभवनाचं उद्घाटन होणार
या सेनाभवनाचं काम काही प्रमाणात पूर्ण झालं आहे. येत्या डिसेंबरच्या शेवट किंवा नव्या वर्षात या सेनाभवनाचा मोठा उद्घाटन सोहळा होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन तारीख निश्चित केली जाणार आहे. उद्घाटनाला शिंदे गटाचे मंत्री आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.