Ayush Komkar Case: आयुषच्या खुनासाठी पिस्तूल कुणी दिलं? मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर दिली कबुली, बंडू आंदेकर नव्हे तर, खरा मास्टरमाईंड...
Ayush Komkar Case: तपास अधिकाऱ्यांनी कृष्णा हा मारेकरी आणि कट रचणारे आरोपी यांच्यातील मुख्य ‘लिंक’ असल्याचा दावा केला आहे.

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मुलगा गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा गोळीबार करून खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (७०, रा. नाना पेठ) याच्यासह १३ जणांविरोधात खून व मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर (३६) स्वतःच्या भाच्याच्या खुनानंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर याने ‘कृष्णाचा शोध दे, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल,’ असा दावा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला. नाना पेठ परिसरातील आयुष कोमकर खूनप्रकरणात महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या कृष्णा आंदेकरनेच मारेकऱ्यांना पिस्तूल पुरविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. हे शस्त्र त्याला नेमके कोठून मिळाले, फरारी असताना तो कोणाच्या संपर्कात होता आणि या काळात गुन्ह्याचे पुरावे नष्ट केले का, याचा तपास करणे आवश्यक असल्याचे मत पुणे पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात मांडले. तपास अधिकाऱ्यांनी कृष्णा हा मारेकरी आणि कट रचणारे आरोपी यांच्यातील मुख्य ‘लिंक’ असल्याचा दावा केला आहे.
गुन्हे शाखेने त्याला अटक करून विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केले. सहायक आयुक्त शंकर खटके व विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी न्यायालयात सांगितले की, “हा खून मालमत्ता आणि पैशांच्या वादातून झाला आहे. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कृष्णानेच दिले असल्याची कबुली इतर आरोपी अमन पठाण व सुजल मेरगू यांनी दिली आहे. त्यामुळे पिस्तूल कुठून आणले, फरारी असताना तो कोणाच्या संपर्कात होता, तसेच त्याची स्थावर-जंगम मालमत्ता तपासणे आवश्यक आहे.”दरम्यान, आरोपीच्या वतीने अॅड. मनोज माने, अॅड. मिथुन चव्हाण आणि अॅड. प्रशांत पवार यांनी बचाव मांडताना, “गुन्ह्यातील पिस्तूल आधीच जप्त झाले आहे. आरोपी स्वतःहून हजर झाला असून तपासास सहकार्य करत आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची आवश्यकता नाही,” असा युक्तिवाद केला. सरकार व बचाव पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने कृष्णा आंदेकरला १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे या खटल्यातील सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून तपास अधिकाऱ्यांना वैयक्तिक तसेच सामूहिक चौकशीची संधी मिळणार आहे.
मारेकऱ्यांनी दिली कबुली
पोलिसांनी कृष्णा आंदेकरकडे त्याचा मोबाइल मागितला असता, त्याने तो फोडून फेकून दिला असल्याचे सांगितले; तसेच 'मकोका' कायद्यानुसार कारवाईची नोटीसही घ्यायला नकार दिल्याची कबुली आरोपीने न्यायालयात दिली.























