Ashadhi Wari 2022: पालखी सोहळ्यासाठी PMPML कडून वारकऱ्यांसाठी जादा बसेसची सोय
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले दोन वर्ष वारी जोमात होऊ शकली नाही मात्र यावर्षी पायी वारी होणार आहे. यात वारकऱ्यांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलकडून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.
Ashadhi Wari 2022: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर,उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहूत अनेक वारकरी उपस्थित असतात. त्यांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी दरवर्षी पुणे पीएमपीएमएलकडून जादा बसेसची सोय करते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले दोन वर्ष वारी जोमात होऊ शकली नाही मात्र यावर्षी पायी वारी होणार आहे. यात वारकऱ्यांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलकडून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.
भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक 18 जून पासून दिनांक 22 जूनपर्यंत आळंदी करीता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सध्या सुरु असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रत्येक दिवशी एकूण 130 बसेस सुरु राहणार आहेत. दिनांक 21 जून रोजी रात्री साडेबारा वाजेपर्यंत आळंदीला जाण्याकरीता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय देहूकरीता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सध्याच्या सुरु असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकुण 22 बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा 10 बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.
दिनांक 22 जूनरोजी पालखी आळंदीमधून प्रस्थान होत असल्यामुळे पहाटे तीन वाजेपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाण्याकरीता जादा 18 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त नेहमीच्या सुरु असणाऱ्या बसेस सकाळी साडेपाच वाजेपासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील 101 बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्या सेवेसाठी सुरु राहणार आहेत.
याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार देण्यात येईल. तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक 24 जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी बारा ते एक दरम्यान थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.