आमदाराच्या पुतण्याच्या गाडीनं दोघांना चिरडलं; नेमका कसा घडला अपघात? घटनेची A to Z इन्साईड स्टोरी
Pune Accident : आमदार दिलीप मोहितेंचा पुतण्या मयूर मोहितेकडून नेमका कुठं अपघात झाला? कसा झाला? नेमकी चूक कोणाची होती? मयूरनं कोणत्या दिशेनं आणि कशी गाडी चालवली? याचा आढावा एबीपी माझानं घटनास्थळी जाऊन घेतला आहे.
Pune Nashik Highway Accident: पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway Accident) कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात कारचालकानं दोघांना चिरडलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याकडून हा अपघात झालाय. या प्रकरणी मोहिते पाटलांचे पुतणे मयुर मोहितेवर (Mayur Mohite) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या कार चालवताना दारुच्या नशेत होता, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी आरोपी मयूर मोहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार दिलीप मोहितेंचा पुतण्या मयूर मोहितेकडून नेमका कुठं अपघात झाला? कसा झाला? नेमकी चूक कोणाची होती? मयूरनं कोणत्या दिशेनं आणि कशी गाडी चालवली? याचा आढावा एबीपी माझानं घटनास्थळी जाऊन घेतला आहे. तसेच, प्रत्यक्षदर्शींसोबतही सविस्तर बातचित केली आहे. जाणून घेऊयात आमदाच्या पुतण्याच्या अपघाताच्या घटनेची A to Z इन्साईड स्टोरी...
अपघात कसा घडला?
पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीनं चिरडलं. या घटनेत ओम भालेराव (वय 19 वर्ष) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याच्या दिशेनं येत होता. तो विरुद्ध दिशेनं सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना त्याच्या भरधाव कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू आहे.
मयूरची दुचाकीला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर, तरुणाचा जागीच मृत्यू
मयूर मोहिते नारायणगावहून खेडच्या दिशेनं जात होते. मयूर मोहितेची गाडी कळंबजवळ पोहोचताच मंचरवरुन येणाऱ्या दुचाकीला मयूरच्या भरधाव गाडीनं जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, दुचाकी हवेत उडाली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. महत्त्वाची बाब म्हणजे, मयूर मोहिते एवढ्या वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवत होते की, त्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूनं गाडी चालवणं अपेक्षीत होतं. पण मयूर मोहितेची गाडी रस्त्याच्या उजव्या बाजुला आली आणि तिनं दुचाकीला जोरदार धडक दिली. मयूर मोहितेनं दुचाकीला दिलेली धडक अत्यंत जोरदार होती. दुचाकी हवेत उडाली आणि पार चक्काचूर झाला. दुचाकीचे पार्ट्स तब्बल 20 फुट अंतरापर्यंत विखुरलेले आहेत. प्रथमदर्शनी तरी अपघात मयूर मोहिते यांच्याच चुकीमुळं झाल्याचं बोललं जात आहे.
मयूरवर कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल?
आमदार दिली मोहितेंच्या पुतण्यावर अपघाता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 304/2 मृत्यूस कारणीभूत, मात्र मृत्यू घडवून आणण्याच्या हेतू शिवाय, कलम 279 बेदरकारपणे वाहन चालवणं, कलम 337/338 दुखापत, मोटार वाहन कायदा कलम 184 तत्परतेनं मदत न करणं, या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघात झाला त्यावेळी मयूर दारू प्यायलेला? आमदार काका काय म्हणाले?
मध्यरात्रीच्या वेळी ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी मयूर यांनी मद्यपान केलेलं होतं. त्याचबरोबर मयुरनं अपघातानंतर इथून पळ काढला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. पण मयूर मोहितेचे काका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मात्र, स्थानिकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मयूप इंजिनिअर आणि उद्योजक आहे. आजवरच्या आयुष्यात त्यानं कधीच दारूला स्पर्श केलेला नाही. तो घटनास्थळावरुन पळूनही गेला नाही, असं आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले आहेत.
आमदारांचा पुतण्या मयूर मोहिते नेमका कोण?
पुणे नाशिक महामार्गावर कळंब नजिक झालेल्या अपघात प्रकरणात खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर मोहितेनं भरधाव कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर घडली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेतील मुख्य आरोपी मयूर मोहिते हा पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू साहेबराव मोहितेंचा मयूर मोहिते पाटील मुलगा आहे. आमदार मोहितेंच्या पाठोपाठ पुतण्या मयूर सर्व राजकीय धुरा सांभाळतो. तो इंजिनिअर असून सध्या कुटुंबाचा व्यावसाय सांभाळतो. तसेच, मयूर सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची तयारी करत असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : Pune Nashik Highway Accident : आमदाराच्या पुतण्याने बाईकस्वाराला चिरडलं,अपघात नेमकं कसा घडला?
महत्त्वाच्या इतर बातम्या :