(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar: पोलिसांनी पत्रकारांना अडवलं, अजितदादांनी थेट आयुक्तांनाच खडसावलं
पोलिसांनी पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखू नये. असं म्हणत दादांनी पोलीस आयुक्तांची कानउघाडणी केली.
पिंपरी - चिंचवड : कोणताही मोठा नेता शहरांमध्ये आला की प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवत पत्रकारांना नेत्यांपर्यंत पोहोचू न देणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीसांचीआज पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (VinayKumar chaube) यांना बोलवून घेत फैलावर घेतले. पंधरा दिवसांपूर्वीच गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) पत्रकारांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावेळी फडणवीसांनी पोलिसांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या, तरी ही आज पुन्हा पोलिसांनी अजित पवार यांच्याकडे पत्रकार जात असताना त्यांची अडवणूक केली, त्यामुळे अखेर पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे पोलिसांची तक्रार केली. मग अजित पवारांनी थेट विनय कुमार चौबे यांना फैलावर घेतले.
आत पवार यांनी चौबे यांना बोलवले, यापुढं पत्रकारांना पोलिसांनी रोखू नये. महायुतीचे मंत्री पत्रकारांशी बोलायचे का नाही हे ठरवतील, पण पोलिसांनी पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखू नये. असं म्हणत दादांनी पोलीस आयुक्तांची कानउघाडणी केली. दरम्यान 22 तारखेला मोठा उत्साह राहणार असून सर्व इमारतींवर रोषणाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पदभार स्वीकारला तेंव्हापासून त्यांचा शहरावर काही वचक दिसलाच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतरचं चौबे प्रकट होतात. एरवी देखील ते आयुक्तालयाच्या आलिशान कार्यालयातच ठाण मांडून असतात. राष्ट्रपती पदक विजेते विनयकुमार चौबेंचा पिंपरी चिंचवडमध्ये सध्या हा असाच कारभार सुरु आहे. जो नेहमी चर्चेचा विषय ठरतो. विशेष म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीची नाराजी पसरलेली आहे. अनेक पोलीस अधिकारी खाजगीत बोलून ही दाखवतात.
पत्रकारांची जाणीवपूर्वक अडवणूक करतात आयुक्त चौबे
पोलीस आयुक्तालयात तर एका व्हायरल पत्राची खुमासदार चर्चा रंगलेली आहे. त्यात ही पोलीस आयुक्त चौबेंच्या कार्याला घेऊन, खदखद व्यक्त केली गेलीये. पण "आपलेच दात आणि आपलेच ओठ" म्हणत सगळेच मौन धारण करून आहेत. शहरासह पोलिसांवर ही वचक ठेवण्यात अपयशी ठरलेले पोलीस आयुक्त चौबे पत्रकारांना मात्र वेठीस धरतात. शहरात कोणताही मोठा नेता आला की त्या नेत्याला खुश ठेवण्यासाठी ते पत्रकारांना कोसो दूर ठेवण्याची रणनीती आखतात. सुरक्षेचे कारण पुढं करून एका ही पत्रकारांला नेत्याजवळ न सोडण्याचे फर्मान त्यांनी काढल्याचं बंदोबस्तात असणारे पोलीस सांगतात. त्यांचं हे फर्मान दोन आठवड्यांपूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर पत्रकारांनीच घातलं. तेंव्हा पत्रकारांना माझ्या जवळ येऊ देऊ नये, अशी कोणती ही सूचना मी पोलीस आयुक्त चौबेंना दिली नाही, असा खुलासा फडणवीसांनी केला. त्यांनी चौबे यांना योग्य त्या भाषेत सूचित ही केलं. त्यावेळी पोलीस आयुक्त चौबेचं पत्रकारांची जाणीवपूर्वक अडवणूक करत असल्याचं स्पष्ट झालं.
अजित पवारांकडे तक्रार
त्यानंतर पोलीस आयुक्त चौबे यांच्या मर्जीत राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांची समजूत काढण्यासाठी पुढाकार घेतला. विरोधात बातम्या येऊ नये म्हणून हे पोलीस अधिकारी समेट घालण्याचा आटापिटा करू लागले. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहरात आले. पंतप्रधान आवास योजनेच्या सदनिकांची सोडत पवारांच्या हस्ते झाली. त्यानंतर या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार पुढं आले. तेंव्हा पिंपरी चिंचवड पोलिसांची तीच अडमुठी भूमिका कायम दिसली. यावेळी तर डीसीपी स्वप्ना गोरेंनी वेगळंच फर्मान धाडलं. तुम्हाला अजित पवार अथवा कोणत्याही नेत्यांच्याजवळ जायचं असेल तर तसा अद्यादेश जिल्हाधिकारी यांच्याकडून घेऊन या. आता हा मनमानी आदेश चौबेंच्या सूचनेनुसारचं दिलं असणार, हे उघड होतं. पण हे अजब फर्मान ऐकून सर्वांना 'हसावं की रडावं' हेच कळत नव्हतं. सरतेशेवटी पोलीस आयुक्त चौबेंची अजित पवारांकडे तक्रार करण्यात आली.
चौबेंची कानउघाडणी दादांच्या शैलीत
मग दादांनी चौबेंना बोलवून घेतलं आणि पत्रकारांसमोरच फैलावर घेतलं. मुख्यमंत्री शिंदे असो, उपमुख्यमंत्री फडणवीस असो की मी आम्हाला झेड प्लस सुरक्षा असली तरी पत्रकारांना पोलिसांनी अडवायचे नाही. ते त्यांचं काम करत असतात, त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. त्यामुळं त्यांची अडवणूक पोलीस करू शकत नाहीत. पत्रकारांशी बोलायचं की नाही ते आम्ही नेते ठरवू. यापुढं पत्रकारांची तक्रार येता कामा नये, असं म्हणत चौबेंची कानउघाडणी दादांनी त्यांच्या शैलीतच केली. आता यापुढं तरी पोलीस आयुक्त चौबे सुरक्षेचे कारण पुढं करून नको ते फर्मान काढणार नाहीत. अशी माफक अपेक्षा आहे.