Ajit Pawar VIDEO : भटकी कुत्री मुलांना त्रास देतात, नागरिकाच्या तक्रारीवर अजितदादांचा पुणे आयुक्तांना फोन, म्हणाले...
Ajit Pawar Call To Pune Commissioner : नागरिकांनी कचऱ्यासंबंधी तक्रार केल्यानंतर त्यावर लगेच कारवाई करा, नागरिकांच्या समस्या सोडवा असा आदेश अजित पवारांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिल्या.
पुणे : पुण्यातील वडगाव शेरी भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी थेट पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना फोन लावला. त्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर, कचऱ्याच्या समस्येवर तसेच दारू दुकानाच्या बाहेरच्या अतिक्रमणावर सूचना दिल्या आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. अजित पवारांनी वडगाव शेरीमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.
वडगाव शेरी भागातील समस्यांवर झालेल्या बैठकीत एका नागरिकाने त्यांच्या सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर अजित पवारांनी आयुक्तांना फोन केला. भटक्या कुत्र्यांसाठी वेगळी जागा निर्माण केली आहे तिकडे सगळी कुत्री घेऊन जावीत आणि त्यांना इंजेक्शन द्यावं असे आदेश त्यांनी दिले. काहीजण या प्रश्नावर कोर्टात जातात आणि कुत्र्यांकडून निकाल आणतात. सगळ्या प्राण्यांबद्दल प्रेम आदर आहे. पण त्या प्राण्यांचा त्रास लहान मुलांना व्हायला नको. ही समस्या लवकर सोडवली पाहिजे असं अजित पवारांनी सागितलं.
काय आदेश दिले अजित पवारांनी?
या बैठकीत अनेकांनी तक्रारी केल्या की कचऱ्याची गाडी येत नाही, वॉर्ड अधिकारी जागेवर नसतो. त्यावर फोन केला तर सांगितलं जातंय की त्यासाठी फंड्स नाहीत. लोकांच्या समस्या लवकर सुटण्यासाठी अशी काही व्यवस्था करा की तासाभरात त्यांचं समाधान झालं पाहिजे.
दारूच्या दुकानासमोर अंडी विकणारे आणि इतर काही विक्रेते बसतात, रस्त्यावरच त्यांनी अतिक्रमण केल्याने तिथून जाणाऱ्या महिलांना त्याचा त्रास होतो असं एका महिलेने अजित पवारांना सांगितलं. त्यावर अजित पवार यांनी राजेंद्र पवारांना सांगितलं की, अतिक्रमणाबाबत काही वाईटपणा घ्यावा लागेल आणि ती तोडावी लागतील ते करा. पाच टक्के वाईटपणा घेतला तर 95 टक्के काम होतील. दारूची दुकानं झालीत, त्याच्याबाहेर अतिक्रमण झालेत, त्यावर कारवाई करा.
ही बातमी वाचा: