Ajit Pawar : अजित दादा लवकर मुख्यमंत्री व्हा; पिंपरी चिंचवडमध्ये झळकले बॅनर
पिंपरी चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे अजित दादा तुम्ही लवकर मुख्यमंत्री व्हा, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे
Ajit Pawar : पिंपरी चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे अजित दादा (Ajit Pawar) तुम्ही लवकर मुख्यमंत्री व्हा, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यासोबतच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उर्से टोलनाक्यावर 15/250 फुटाचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये दादांचीच हवा असल्याचं दिसत आहे.
अजित पवार यांनी बंड करुन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं अनेक नेत्यांना वाटत आहे. अनेक नेत्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली आहे. त्यातच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे बॅनर लावण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगू लागली आहे.
बंड करण्यापूर्वी अनेकदा अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. अनेक कार्यक्रमात त्यांनी यासंदर्भात वक्तव्य देखील केली होती. त्यावेळी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा राज्यभर झाली होती. मात्र बंडानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यासोबतच राज्याचं अर्थमंत्री पद देण्यात आलं आहे. अर्थमंत्रीपद मिळाल्यावर लवकर अजित पवार तुम्ही मुख्यमंत्री व्हा, अशा आशयाचे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत- अण्णा बन्सोडे
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं आमचं ध्येय आहे, म्हणूनच आम्ही या सत्तेत सहभागी झालो आहोत, असा गौप्यस्फोट पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केला होता. अजित पवारांच्या 2019च्या भल्या सकाळी झालेल्या आणि गेल्या आठवड्यात झालेल्या शपथविधीचे बनसोडे हे साक्षीदार होते. या दोन्ही शपथविधीवेळी मी त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे उभा होतो, असं ते म्हणाले आहेत. अजित पवार हे कायम विकासावर भर देतात. दीड वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एवढ्या वर्षात रखडलेली कामं पूर्ण केली तर महाराष्ट्रातील जनता नक्कीत अजित पवारांवर विश्वास ठेवतील. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार येतील आणि त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. राष्ट्रवादीचे प्रत्येक नेते आणि आमदार आपल्या भागात रखडलेल्या कामांवर लक्ष देत आहेत. ती सगळी कामं पूर्ण झाली पाहिजे आणि प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे या हेतूने सगळे अजित पवारांच्या सोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nashik News : नाशिकला आज मंत्र्यांची मांदियाळी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाला नऊ मंत्र्याची उपस्थिती