राज्यपालांना पुन्हा भेटणार, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य
आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही, म्हणून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. याबाबत घटनातज्ञांचा सल्ला घेणार असल्याचे ते म्हणाले.
पुणे : आम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ शकत होतो, मात्र आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही, म्हणून निवडणूक घेतली नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. याबाबत आम्ही राज्यपालांना पुन्हा भेटणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत घटनातज्ञांचा सल्ला घेणार आहे. ज्या घटनात्मक बाबी उपस्थित केल्या आहेत, त्याबाबतही तज्ञांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपालांचा आदर राखूनच आम्हाला राज्य चालवायचे आहे. मात्र, काहींना समजूतदारपणा आणि असमजूतदारपणा यामधील फरकच कळत नसल्याचे म्हणत अजित पवारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. विधनसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आम्ही समजूतदारपणा दाखवला असल्याचे पवार म्हणाले. पहाटेच्या शपथविधीबद्दल देखील अजित पवार यांना विचारण्यात आले, यावर अजित पवार यांनी बोलण्यास नकार दिला.
महात्मा गांधींबद्दलचे वक्तव्य चुकीचे
कोणतीही व्यक्ती असली तरी, त्याने महात्मा गांधी यांच्याबद्दल चुकीचे बोलू नये. त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे पवार म्हणाले. प्रत्येकाने प्रत्येकाचा मान राखला पाहिजे. प्रत्येकाला त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याचा गैरवापर करु नये. कोणाजर अधिकाराचा गैरवापर केला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असे अजित पवार यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाला अहवाल
कोरोनाच्या संकटामुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला दिला आहे. याबाबत दोन्ही सभागृहामध्ये एकमताने ठराव देखील केला आहे. आयोगाला कळवले असून, ते काय निर्मय देतात ते पाहणे महत्त्वाचे असल्याचे अजित पवार म्हणाले.
निर्बंध कडक करण्याचे संकेत
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहे. ओमायक्रॉनची तीव्रता कमी असली तरी तो देखील कोरोनाचा एक भाग आहे. सध्या रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे, त्यानंतर निर्बंधाबाबत निर्णय घेऊ असे पवार यांनी सांगितले. आम्हालासुद्धा काही बंधने घालावी लागतील असे पवार म्हणाले. मात्र, आम्ही बाहेर नाही पडलो तर मंत्री घरात बसतात म्हणून टीका होते असेही ते म्हणाले.