एक्स्प्लोर
एमपीएससी परीक्षा पास होऊनही नियुक्ती नाही, पुण्यात उमेदवार हतबल
सरकारी अनास्थेचा फटका पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना बसलाय. राज्य सरकारने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे राज्यसेवेची मुख्य परीक्षा पास होऊनही 377 उमेदवार अजून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

पुणे : राज्य सरकारच्या धोरणामुळे प्रशिक्षण होऊनही 154 पीएसआय नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. हे प्रकरण ताजं असतानाच असाच एक प्रकार समोर आलाय. सरकारच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र राज्य सेवा आयोग (MPSC) ची परीक्षा पाऊस होऊनही 377 उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. सरकारच्या या भूमिकेवर आक्षेप घेत लवकरात लवकर नियुक्ती करण्याची मागणी उमेदवारांनी घेतली आहे. 2017 साली घेतलेल्या एमपीएससीचा निकाल 30 मे 2018 रोजी जाहीर झाला. यामध्ये एकूण 377 उमेदवारांची वर्ग अ आणि वर्ग ब च्या प्रशासनातील महत्त्वाच्या पदांसाठी निवड झाली. मात्र निवड होऊनही हे उमेदवार सेवेत रुजू झालेले नाहीत. याचं कारण म्हणजे मुख्य परीक्षेनंतर समांतर आरक्षण या विषयावर न्यायालयात याचिका दाखल झाली. या याचिकेमुळे निकालही उशिराने लागला होता. या याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत कुणाचीही नियुक्ती करुन घ्यायची नाही या सरकारच्या भूमिकेवर निवड झालेल्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. ही याचिका फक्त निवड झालेल्या 17 उमेदवारांच्या संदर्भात होती. यामध्ये उरलेल्या 360 उमेदवारांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे आमची लवकरात लवकर नियुक्ती करुन सेवेत रुजू करुन घेण्यात यावे अशी मागणी या उमेदवारांनी सरकारकडे केली आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी धोरणाचा फटका नेहमीच बसत आलाय. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्तीपर्यंत पोहोचणं किती कठीण असतं याची कल्पनाही सरकारी पातळीवर नसेल. त्यामुळेच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही अशा प्रकारे ताटकळत ठेवलं जात आहे.
आणखी वाचा























