नागपूरः मनपाच्या महिला आरक्षणाच्या सोडतीनंतर पुरुषांचा प्रभाव असलेल्या महत्वाच्या प्रभागांमध्ये आता महिला लढत देताना दिसणार आहेत.


सुरेशभट सभागृहात आयोजित महिला आरक्षणाच्या सोडतीत महिलांच्या तुलनेत पुरुषांचीच संख्या जास्त दिसून आली. सभागृहात बोटावर मोजण्याएवढ्याच महिला दिसून आल्या. 50 टक्के वाटा असतानाही महिलांमध्ये आरक्षणाची उत्सुकता दिसून आली नाही. मात्र विविध प्रभागातील कार्यकर्ते आरक्षणावर लक्ष ठेवून होते.


मनपाच्या निवडणूक विभागाने सर्वसाधारण प्रवर्गात महिला आरक्षण काढण्यापूर्वी 'अ' गटात 17 व 'ब' गटात 27 जागेवर महिलांचे आरक्षम आधिच निश्चित केले होते. त्यानुसार या दोन्ही गटात महिलांना थेट आरक्षण देण्यात आले. उरलेल्या 12 जागांसाठी महिलांचे आरक्षण काढण्यासाठी 17 चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यातून 12 चिठ्ठ्या काढून महिला आरक्षण निश्चित करण्यात आले.


राष्ट्रवादी, कॉंग्रेस नेत्यांचा मार्ग मोकळा


राष्ट्रवादीचे नेते दुनेश्वर पेठे, आभा पांडे यांचाही मार्ग या आरक्षणा सोडतीतून मोकळा झाला आहे. तसेच कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, पुरुषोत्तम हजारे, सतीश होले, संदीप सहारे, मनोज सांगोळे, रमेश पुणेकर यांना संधी मिळणार आहे. यासोबतच भाजपचे माजी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, प्रकाश भोयर यांचे प्रभाग सेफ आहेत.


हेही वाचा Nagpur Municipal Corporation Elections 2022 : नेत्यांकडे घुसखोरीशिवाय पर्याय नाही


उघडले लॉक; जनसंपर्क कार्यालयांची सफाई


2017च्या मनपा निवडणूकीनंतर नगरसेवकांसह अनेकांची जनसंपर्क कार्यालय ओसाड पडले होते. काहींचे तर विकेंड कार्यालय सुरु होते. मात्र आरक्षण सोडत संपताच अनेक बंद पडलेल्या कार्यालयांची सफाई करुन कार्यकर्त्यांची वर्दळ याठिकाणी वाढायला सुरुवात झाली आहे.


हेही वाचा Nagpur NMC Elections 2022 : आरक्षण सोडतीनंतर अनेकांची गोची


संदीप जोशी निर्णय फिरवणार?


माजी महापौर संदीप जोशी यांनी महानगरपालिका निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र, आरक्षण सोडतीत त्यांच्या प्रभाग 49 मध्ये दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने लढण्याचा मार्ग मोकळा आहे. ते आपला निर्णय फिरवतात की कायम ठेवतात, याकडे लक्ष लागले आहे. याच प्रभागातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोयर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


हेही वाचा Congress : कॉंग्रेसच्या नवसंकल्प शिबीरातील ठराव विदर्भात अमान्य?