Uddhav Thackeray Rally: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 8 जून रोजी पार पडणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे. बुधवारी सकाळी शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थित सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर स्तंभपूजन करून पूजा करण्यात आली. त्यामुळे आजपासून मैदानावर सभेची प्रत्यक्षात तयारी सुरु झाली आहे.
मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत 8 जून 1985 रोजी स्थापन झाली. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या सभेतून उद्धव ठाकरे विरोधकांचा समाचार घेणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. या सभेसाठी संपूर्ण मराठवाड्यातील शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यानुसार आज सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर स्तंभपूजन करून पूजा करण्यात आली. यावेळी चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
तोच मैदान...
गेल्या महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विराट सभा याच मैदानावर झाली होती. त्यांच्या या सभेची जोरदार तयारी सुद्धा झाली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. आता उद्धव ठाकरे सुद्धा त्याच मैदानावर सभा घेणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या सभेतून त्यांना काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
फडणवीसांवर साधणार निशाणा?
राज ठाकरेंच्या सभेनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा औरंगाबादमध्ये पाण्याच्या मुद्यावरून भव्य मोर्चा काढला होता. यावेळी शहरातील पाणी प्रश्वनावरून त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेतील भाषणात फडणवीस सुद्धा निशाण्यावर असणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेकडून जोरदार तयारी...
राज ठाकरे यांच्या सभेला झालेल्या गर्दीची मोठी चर्चा झाली होती. उद्धव ठाकरेंच्या सभेला त्यापेक्षा अधिक गर्दी होणार असल्याचा दावा शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. गाव,वार्ड,तालुका आणि मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेऊन नियोजन केले जात आहे.