Prakash Ambedkar: कोण पृथ्वीराज चव्हाण, मी माझ्या स्टेटसच्या व्यक्तीसोबत बसतो; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला फटकारलं
Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेस पक्षावर खरमरीत शब्दांत टीका. भाजपला लोकसभा निवडणुकीत विजय मिळेल, याबाबत खात्री नाही. मविआची भाजपसोबत सेटलमेंट झाल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप. श्रीकांत शिंदेंसमोर कमकुवत उमेदवार.
मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यात युती करण्याच्यादृष्टीने बोलणी झाली होती. मात्र, ही बोलणी यशस्वी ठरली नव्हती. या पार्श्वभूमीवर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये काँग्रेस पक्षाला फटकारले. यावेळी त्यांनी काँग्रेस (Congress) पक्षाला खडे बोल सुनावले. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी काँग्रेसची साथ का सोडली, याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
काँग्रेस पक्षाला जिंकायचेच नाही कारण त्यांच्या मागे ईडी, सीबीआय आहे. मी त्यांच्यासोबत बोलणी करत होतो, तेव्हा मी म्हणालो तुम्ही खर्गेंच्या बाजूने सर्वांना एकत्र करताय पण राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) बाजूने पार्टी उध्वस्त करत आहात. तुम्ही सर्व प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करताय, ते ही निवडणूकीच्या तोंडावर, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
प्रकाश आंबेडकरांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका
मविआसोबत जागावाटपाची बोलणी सुरु असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. मविआचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यापासून जाणीवपूर्वक अंतर ठेवून असल्याचा आरोपही वंचितकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले.
कोण पृथ्वीराज चव्हाण? मी का त्यांच्याशी बोलायचं? मी माझ्या स्टेटसच्या माणसासोबत बसेन. ते मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्याशी बोलावं, काय अधिकारी आहेत त्यांच्याकडे? त्यांना काँग्रेस पक्षात कोण विचारत नाही आणि आम्ही त्यांच्याशी बोलावे, असे अनेक सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले. काँग्रेस हायकमांडशी मी काय बोलावं? त्यांनाच आम्ही नको होतो. आज काँग्रेस पक्षाला इतर पक्षांची साथ मिळत नाही. नितीश कुमार यादव, ममता बॅनर्जी हे साथ सोडून का गेले, याचा विचार काँग्रेस पक्षाने केला पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
तसेच प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले. सुभाष देसाई सोबत असताना शिवसेनेला आमच्यासोबत जायचं होतं. पण नंतर संजय राऊत आले आणि त्यांचा विचार बदलला. तेव्हा महाविकास आघाडीसोबत घेऊन आमच्याशी बोलणी सुरु केली मग आम्ही बाहेर पडलो, असे आंबेडकर यांनी सांगितले.
आणखी वाचा