मुंबई/सोलापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर असतानाच मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. त्यामध्ये, राज ठाकरे यांचे खास आणि मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या मुंबईतील बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, दुसरा उमेदवार मुंबई, पुणे, ठाणे किंवा नाशिकमधील नसून चक्क सोलापुरातील जाहीर करण्यात आला आहे. मनसेनं पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली. मनसेचे सरचिटणीस असलेल्या संदीप देशपांडे यांच्या उमेदवारीपूर्वीच दिलीप धोत्रेंची उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच, बाळा नांदगावकर यांच्यासमवेत उमेदवारी जाहीर केलेले दिलीप धोत्रे नेमकं कोण आहेत, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे हे आमदार आहेत.
दिलीप काशिनाथ धोत्रे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार असल्याचे पत्रकच मनसेनं जाहीर केलं आहे. त्यामुळे, काही दिवसांपूर्वीच राज्यात 225 जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यातूनच याची सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभा एकला चलो रे चा नारा देत आहेत. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केल्यामुळे भाजप महायुतीत ते सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. कारण, येथील मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान अवताडे आहेत. त्यामुळे, महायुतीमध्ये मनसेचं स्थान नसणार असल्याचे दिसून येते. मात्र, ऐनवेळी भाजप नेते राज ठाकरेंची मर्जी राखत त्यांना महायुतीत सहभागी होण्यासाठी राजी करतात का, ते पाहावे लागेल. मात्र, मनसेनं उमेदवारी जाहीर केलेले दिलीप धोत्रे कोण, असाही प्रश्न अनेकांना पडला असून दिलीप धोत्रे हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत आहेत.
कोण आहेत दिलीप धोत्रे
दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असून विद्यार्थी दशेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. इंग्रजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले दिलीप धोत्रे हे युवकांमध्ये लोकप्रिय असून ते मूळ शिवसैनिक आहेत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला, उत्तम संघटन कौशल्य असल्याने शिवसेना ते मनसे असा त्यांचा प्रवास चढत्या क्रमाने झाला. राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे हे 1992 साली पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत त्यांचा नेहमी मोठा सहभाग होता. धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्या वेळीच त्यांच्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून प्रथम शिवसेना सोडून राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला होता. सोलापूर जिल्ह्यातील मनसेच्या वाढीत धोत्रे यांचा मोठा वाटा आहे. जिल्हा संघटक, शाडो सहकारमंत्री, प्रदेश सरचिटणीस अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी मनसेमध्ये पार पाडली आहे. त्यानंतर, नुकेतच त्यांना पक्षात नेतेपदही देण्यात आले आहे.
2009 साली निवडणूक लढवली
आता राज ठाकरेंनी 2024 विधानसभेसाठी जे पहिले दोन उमेदवार जाहीर केले त्यात दिलीप धोत्रे यांचा समावेश आहे. दिलीप धोत्रे यांनी यापूर्वी 2009 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते, नंतरच्या काळात धोत्रे यांनी कामगार शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नावर अनेकवेळा आवाज उठवत आंदोलने केली. कोविडच्या काळातही त्यांनी मोठे काम केल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात त्यांचा मोठा मतदार वर्ग तयार झालेला आहे. तर, राज ठाकरेंच्या सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर येथील दौऱ्यांतही दिलीप धोत्रे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी असते.