MNS Assembly Election 2024 : मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election) 2024 साठी मनसेने (MNS) दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज सोलापूर (Solapur News) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) दोन उमेदवार जाहीर केले. याबाबत मनसेने पत्रक प्रसिद्ध केलं आहे.


मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी (Shivadi Assembly Constituency) पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना उमेदावादी जाहीर केली. सध्या शिवडी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे  अजय चौधरी, तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे विद्यमान आमदार आहेत. 


मनसेच्या प्रसिद्धी पत्रकात काय म्हटलंय?


मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा - नवनिर्माण यात्रा सुरु असून आज सोमवार सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे मा.राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या खालीलप्रमाणे दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे.


1. शिवडी विधानसभा : बाळा नांदगांवकर (Bala Nandgaonkar)
2. पंढरपूर विधानसभा : दिलीप धोत्रे (Dilip Dhotre)


शिवडी विधानसभा (Shivadi Vidhan Sabha Election 2024)


शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सध्या अजय चौधरी विद्यमान आमदार आहेत. अजय चौधरी हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. अजय चौधरी हे 2014 आणि 2019 असे दोनवेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकर यांचा पराभव केला होता. तर 2019 मध्ये अजय चौधरी यांनी मनसेच्याच संतोष नलावडे यांचा पराभव करुन, दुसऱ्यांदा विधानसभेवर ठाकरेंचा झेंडा फडकवला होता.


शिवडी मतदारसंघातूनच बाळा नांदगावकर चार वेळा आमदार 


शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (1995-2004) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये मनसेच्या (MNS) तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.


पंढरपूर विधानसभा (Pandharpur Vidhan Sabha Election 2024)


पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur Mangalwedha Bypoll) भाजपनं महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. राष्ट्रवादीसह भाजपनंही ही निवडणूक प्रतिष्ठेच्या केलेली. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवर समाधान आवताडे 3733 मतांनी विजयी झाले. 


पंढरपुरातून विधानसभेचं तिकीट मिळालेले दिलीप धोत्रे कोण? 


राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे हे 1992 साली पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत त्यांचा नेहमी मोठा सहभाग होता. धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्या वेळीच त्यांच्यावर विद्यार्थी सेनेची जबाबदारी टाकली होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यातून शिवसेना सोडून राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केलेला. सोलापूर जिल्ह्यात मनसेची पाळंमुळं रोवण्यात धोत्रे यांचा मोठा वाटा आहे. जिल्हा संघटक, शॅडो सहकारमंत्री, प्रदेश सरचिटणीस अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यानंतर त्यांना पक्षात नेतेपद देण्यात आलं आहे.