सोलापूर: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार्‍या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आता विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मनसेकडून सर्वप्रथम विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या (MNS Candidates) नावांची घोषणा करण्यात आली आहे. मनसेकडून सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, मनसेने मुंबईतील शिवडी आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार शिवडी विधानसभेतून माजी आमदार बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना संधी देण्यात आली आहे. तर पंढरपूर मंगळवेढामध्ये मनसेकडून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. ही घोषणा करुन राज ठाकरे यांनी त्यांचा स्वबळाचा नारा खरा करुन दाखवला असून विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात मनसे शड्डू ठोकणार, हे स्पष्ट केले आहे. 


पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारत भालके यांचे वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतर 2021 साली पंढरपूरमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपने ऐनवेळी रिंगणात उतरवलेल्या समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा 3,503 मतांनी पराभव केला होता. समाधान आवताडे यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये पंढरपूर मतदारसंघात आपले राजकीय बस्तान व्यवस्थित बसवल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. महायुतीत तीन पक्षांचा समावेश असल्याने त्यांचे बळ वाढले होते. मात्र, आता मनसेने दिलीप धोत्रे यांना रिंगणात उतरवल्याने भाजप आणि समाधान आवताडे यांचे राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता आहे. 


कोण आहेत दिलीप धोत्रे?


विधानसभा निवडणुकीत मनसे 250 जागांवर विजय मिळवेल, असा दावा नुकताच दिलीप धोत्रे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती. दिलीप धोत्रे हे मराठवाड्यातील मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेने त्यांच्यावर अलीकडेच नागपूर जिल्ह्याचे विधानसभा निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर दिलीप धोत्रे यांनी नागपूरमध्ये बैठकांचा सपाटा सुरु केला होता. राज ठाकरे यांच्याभोवती असणारे वलय आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला चांगले यश मिळेल, असा दावा दिलीप धोत्रे यांनी केला होता.


 पंढरपूर महाविद्यालयातील विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून 1992 साली दिलीप धोत्रे यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती.  राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दिलीप धोत्रे त्यांच्यासोबत गेले होते.  राज ठाकरे यांनी त्यांच्यावर पक्षाच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी दिली होती. सोलापूर जिल्ह्यात मनसे पक्षसंघटना रुजवण्यात दिलीप धोत्रे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. जिल्हा संघटक, शॅडो सहकारमंत्री, प्रदेश सरचिटणीस अशा मनसेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलीप धोत्रे यांनी पार पाडल्या आहेत. 


आणखी वाचा


मोठी बातमी : मनसेचे विधानसभेसाठी दोन उमदेवार जाहीर, राज ठाकरेंची घोषणा, बाळा नांदगावकरांना उमेदवारी, दुसरा उमेदवार कोण?