Raj Thackeray: राज ठाकरे सकाळी किती वाजता उठतात?; मनसे अध्यक्षांचं मिश्कील उत्तर, झोपेवरही गाढा अभ्यास
राज ठाकरे हे सकाळी उशिरा उठतात अशी टीका त्यांच्यावर नेहमीच होत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकदा राज यांच्या सकाळी उशिरा उठण्यावरुन भाष्य केलं होतं.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या भाषण शैली व कडक, शिस्तप्रिय स्वभावामुळे राजकारणात स्वत:चं वेगळंच स्थान निर्माण करुन आहेत. म्हणूनच, सत्तेत नसतानाही किंवा आमदार, खासदारांची संख्या लक्षवेधी नसतानाही मनसेच्या भूमिककडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. सरकारकडूनही मनसे व राज ठाकरेंच्या आंदोलनाला व मागण्यांना गांभीर्याने घेतले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवरुन नेटीझन्सकडून त्यांना ट्रोल केले जात आहे. गत 2019 च्या निवडणुकीत मोदी आणि अमित शाह (Amit Shah) यांच्याविरोधात मतदान करण्याची भूमिका राज यांनी घेतली होती. तर, यंदाच्या निवडणुकीत मोदींसाठी भाजपाला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने राज ठाकरेंची मुलाखत घेण्यात आली, त्यामध्ये राज यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्यावेळी, झोप आणि सकाळी झोपेतून उठण्याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
राज ठाकरे हे सकाळी उशिरा उठतात अशी टीका त्यांच्यावर नेहमीच होत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकदा राज यांच्या सकाळी उशिरा उठण्यावरुन भाष्य केलं होतं. त्यावर, राज ठाकरेंनीही जाहीर सभेतून पलटवार केला होता. त्यानंतर, अलिकडच्या काळात सोशल मीडियातून राज ठाकरेंच्या उशिरा उठण्यावरुन त्यांना ट्रोल केलं जातं. अनकेदा मिम्सही व्हायरल होत असतात. मात्र, आता राज ठाकरेंनी स्वत:च ते सकाळी किती वाजता उठवतात आणि त्यांची दिनचर्या काय असते, यासंदर्भात माहिती दिली. विशेष म्हणजे झोप किती गरजेची आहे, हेही त्यांनी सांगितले.
तुम्ही कोणालाही सकाळी 8 नंतर बोलावता, त्यामुळे तुमच्याबद्दल गैरसमज आहेत, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर दिलं. ''मला वाटतं गैरसमज असलेले बरे, माझी दिनचर्या तु्म्हाला ऐकायची असेल तर... मी साधारपणे 5 वाजता उठतो, आता टेनिस बंद झालं नाहीतर, सकाळी 6 वाजतो टेनिस खेळायला जायचो. ते पुन्हा सुरू झाल्यावर जाईलच. साधारण 8, 8.30 किंवा 9 वाजता माझी ओपीडी सुरू होते, असे राज यांनी म्हटले. ओपीडी म्हणजे लोकं भेटायला येतात ना..'' असे मिश्कील उत्तरही त्यांनी दिले.
8 तास झोपलंच पाहिजे
पहाटे 5 वाजता जाग येतेच, असं काही नव्हतं की उशिरा उठत नाही, पण पूर्वी कॉलेजमध्ये असताना उशिरा उठायचो. कारण, मला झोप पूर्ण झालेली पाहिजे हे निश्चित. माझा अनेकांना सल्ला आहे की, तु्म्ही 8 तास झोपलंच पाहिजे, नाहीतर आजारी पडेल माणूस, असेही राज यांनी म्हटले. यावेळी, ग्लानीर्भवती भारत.. असे म्हणत श्रीकृष्णाचा दाखला दिला, तर अमेरिका आणि युरोपमध्ये स्लीपींग असोसिएशन आहे, ते प्रचार करतात माणसाने जास्तीत जास्त झोपलं पाहिजे, असा किस्साही त्यांनी सांगितला.
मोदींना दिलेल्या पाठिंब्यावरही भाष्य
आज जे लोक मोदींचा किंवा भाजपाचा विरोध करत आहेत त्यांच्यापैकी कुठल्या नेत्याने किंवा पक्षाने माझ्यासारख्या भूमिका घेतल्या नाहीत. यांना सत्तेवरुन हाकलवलं, त्यांचे पक्ष फोडले म्हणून ते आज भाजपच्या विरोधात गेले आहेत. शिवसेनेला भाजपने पहिल्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर ते मोदींविरोधात बोलले असते का? यांना काहीतरी हवं होतं म्हणून ते मोदींविरोधात बोलत आहेत. माझं तसं नाही, असे परखड भाष्य राज ठाकरे यांनी केले.
हेही वाचा
... तर पवारांची औलाद नाही, अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याला खासदार बनवण्याचा शब्द