Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Maharashtra Politics: आम्ही नागपूरची एकही जागा मित्रपक्षांना देणार नाही, संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसचे विकास ठाकरे कडाडले. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाली आहे.
नागपूर: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. याच मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. नागपूर दौऱ्यावर असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नागपूर शहरातील पूर्व नागपूर या विधानसभा जागेवर आपल्या पक्षाचा दावा केला होता. त्यावर आता काँग्रेसने प्रतिउत्तर दिले आहे. आम्ही नागपूर शहरातील एकही जागा मित्र पक्षासाठी सोडणार नाही, असे काँग्रेसने ठणकावून सांगितले.
2019 साली विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार फक्त 4 हजार मतांनी पराभूत झाला होता. त्यामुळे दक्षिण नागपूरवर आमचा नैसर्गिक दावा असल्याचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांनी सांगितले. मात्र, आमच्या पक्षात अंतिम निर्णय हायकमांडचा असतो. जर हायकमांड म्हणेल तर नागपूर शहरातील सहाच्या सहाही विधान जागा संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पक्षासाठी सोडू, असे विकास ठाकरेंनी संजय राऊत यांच्या दाव्याची खिल्ली उडवली.
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांनी माध्यमांशी बोलू नये: संजय राऊत
पवार गट, ठाकरे गट राज्यातील विविध मतदार संघातील जागांवर दावा करत असेल तर काँग्रेस पक्ष म्हणून आम्हालाही अनेक जागांवर दावा करण्याचा अधिकार आहे. 'जिनके घर शीशे के होते है, वह दुसरोंके घरोपर पत्थर नही फेका करते', अशी टीका करत काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी संजय राऊत यांना टोला लगावला होता.
संजय राऊत महाविकास आघाडीमध्ये असले तरी त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण राहील याबाबत माध्यमांशी बोलू नये. त्यांनी आमच्या हायकमांडशी याबाबत बोलले पाहिजे असेही नितीन राऊत यांनी सांगितले.
मविआच्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत मविआ 96 : 96 : 96 या सूत्रानुसार जागावाटप करु शकते. महाविकास आघाडीत कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नसणार, समान जागांवर लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यामध्ये बऱ्याच अंशी मविआतील नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, मविआतील नेत्यांमधील आपापसातील कुरबुरी जागावाटपाच्या चर्चेत अडथळा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल.
आणखी वाचा
विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप फॉर्म्युला जवळपास निश्चित; महायुतीचा तिढा कायम?