नागपूर : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे. अमित शाह यांनी 45 जागा जिंकण्याबाबत वक्तव्य केलं होतं. यावर विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे. विदर्भ भाजपच्या हातून गेला आहे, मोदी शाह जोडीने कितीही प्रयत्न केले तरी विदर्भात काँग्रेस अन् महाविकास आघाडी 45 जागा जिंकेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 


मोदी जिथं  गेले तिथं भाजपचं नुकसान, वडेट्टीवारांचा आरोप


मोदी शाह जितक्या वेळा महाराष्ट्रात, विदर्भात येतील तितकं भाजपचे नुकसान होणार आहे.मोदी जिथे गेले तिथे भाजपचं नुकसान झालं. मोदी चंद्रपूर, भंडारा गोंदियात गेले तिकडे पराभव झाला.  नशीब ते नागपूरला नाही आले नाही तर गडकरी हरले असते. महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीला निवडून आणायचं ठरवलेलं आहे. 


अमित शाह जेव्हा येतात तेव्हा गडकरी गायब असतात याचा अर्थ भाजपचे पाय खोलात गेला आहे. कितीही प्रयत्न केला तरी ते आता बाहेर काढू शकत नाहीत, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.


भाजपकडे नाही आमच्याकडे कार्यकर्ते येत आहेत. आता आमच्याकडे इनकमिंग सुरू होत आहे महायुती कडे अवकाळी पावसाची झळ पोहोचणार आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.


बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरुन श्रेयवाद सुरु असल्याबाबत विचारलं असता वडेट्टीवार यांनी कायद्यात बदल करा आणि भर चौकात फाशी द्या, असं म्हटलं . एकनाथ शिंदेचा खासदार श्रेय घेत आहे. कायद्यानं शिक्षा देण्याचं सोडून बेकायदा एन्काऊंटर केला. भाजप आणि संघ कार्यकर्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, संस्था चालक घरी बसून आराम करत आहे, पोलीस सांगतात फरार आहे. कायद्यानं त्याला शिक्षा द्यायला पाहिजे. संस्था चालक आरएसएसचे असल्याने त्यांना अटक झाली नाही, त्यांच्यावर कारवाई केली नाही, माझा दावा आहे ते घरी बसून आहेत आहेत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असून हा रडीचा डाव आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. 


सरकारला लाडकी बहीण नव्हे लाडकी सत्ता


सत्ताधाऱ्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात उघड झाले आहेत.सरकारला लाडकी बहीण नाही लाडकी सत्ता आहे,हे स्पष्ट झालं आहे. माझा लाडका मतदार आहे हे त्यांच्या आमदाराच्या मुखातून स्पष्ट झालेलं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या डोक्यात होत ते आमदाराच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे.  


जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे. प्राईम जमीन हडपण्यात हे मास्टरमाईंड आहेत. 5 लाख कोटींची जमीन यांनी वाटलेल्या आहेत असं विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला भूखंड नाकारण्यात आल्याच्य प्रकरणाबाबत बोलताना म्हटलं. 


भाजपचं नेतृत्व नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे करणार असतील तर चांगलं आहे. भाजपची धुरा नागपूरच्या लोकांकडे असली की आम्ही बिनधास्त राहू कारण या लोकांना जनतेनी नाकारलं आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 


इतर बातम्या :