बीड : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 8 वा दिवस आहे. त्यामुळे, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती चांगलीच खालावली असून अंतरवाली व वडगोद्री येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यात मराठा ओबीसी उपोषण चांगलंच तापताना दिसत आहे. सोमवारी मनोज जरांगेंची प्रकृती बिघडल्याने उपोषणाची चांगलीच चर्चा होती. मराठवाड्यात (marathwada) ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. तर, अनेक भागात संमिश्र प्रतिसाद होता. त्याच पार्श्वभूमीवर आज परभणीतील मराठा कार्यकर्त्यांना वडीगोद्री गावातून प्रवेश देत नसल्याने मराठा कार्यकर्त्यांचा मोठा जमाव रस्त्यावर उतरला होता. याच तणावपूर्ण वातावरणामुळे बीडमधून (Beed) छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी बससेवा बंद करण्यात आली होती. अखेर, रात्री उशिरा ही बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. 


बीडमधून छत्रपती संभाजीनगर आणि जालनाकडे जाणारी बससेवा सुरू करण्यात आली आहे. जालन्यातील तणावग्रस्त परिस्थिती व रास्तारोकोामुळे दुपारनंतर संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस बीडच्या बस स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या. अखेर तेथील परिस्थितीच्या सुरक्षिततेचा आढावा घेऊन आता ही बससेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला होता,  त्यामुळे या मार्गावरील सर्व बसेस बीडच्या एसटी आगारातच थांबवून घेण्यात आल्या होत्या. आंदोलनकर्त्यांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. त्यामुळे, बसमधील प्रवाशांची व बसची काळजी घेत या बस स्थानकातच थांबवण्यात आल्या होत्या. 


मनोज जरांगे यांच्या आंदोलन स्थळापासून वडीगोद्रीजवळील धुळे सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको केला. या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमल्याचं चित्र दिसून आलं. वडीगोद्री फाट्यावर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पर्यायी मार्गाने अंतरवलीत जाण्यासाठी पोलीस मध्यस्थी करत होते. त्यानुसार, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलकांनी रस्ता प्रवाशांसाठी खुला केला. त्यामुळे, वाहतूक पूर्ववत झाली आहे.  


वाहतूकीचा खोळंबा, वाहनांच्या रांगाच रांगा


जालना ते वडीगोद्री फाट्यापर्यंत जाणाऱ्या सोलापूर धुळे महामार्गावर मराठा कार्यकर्त्यांसह महिलांनीही ठिय्या धरला आहे. धुळे सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा असून वाहतूकीचा मोठा खोळंबा झाल्याचं चित्र होते. या भागात जागोजागी मराठा आंदोलक, कार्यकर्ते जमले असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात असल्याचे दिसून आले. 


मराठा कार्यकर्ते उतरले रस्त्यावर


वडीगोद्री गावापासून अंतरवली सराटीत जाण्यासाठी परभणीतून आलेल्या कार्यकर्त्यांना अडवल्याने मराठा बांधव रस्त्यावर उतरले असून अंतरवली सराटीत जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची विनंती पोलिसांकडून केली जात आहे. वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे उपोषण सुरु असून या भागात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मराठा ओबीसी आंदोलक आमनेसामने आल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. यानंतर वडीगोद्री ते अंतरवली सराटी जाणाऱ्या मार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याच वडीगोद्री फाट्यावर परभणीतून आलेल्या कार्यकर्त्यांना अडवल्यानं मराठा समाजातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं समजतंय.