मुंबई: राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द मोडला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा करुन त्यांचे उपोषण थांबवले पाहिजे. जरांगे यांचा जीव वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मनोज जरांगे यांना काही इजा झाली तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारने तातडीने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करुन उपोषणाबाबत तोडगा काढावा, असे मत व्यक्त केले. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती येत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचा जीव वाचवणे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांचे उपोषण स्थगित करताना सरकारने स्वत: गंभीर पावलं टाकली पाहिजेत. त्यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला करुन सरकारने आशादायक चित्र निर्माण केले पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात नवी मुंबई येथे बैठक झाल्यानंतर एक आनंदी वातावरण निर्माण झाले होते. पण आता कुठेतरी सरकारने दिलेला शब्द मोडल्याचे समोर आले आहे. माझी मागणी आहे की, सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा समाजासाठीच्या मागण्यांचा गंभीर विचार करुन चर्चा करुन, कोणाचीही मदत लागली तर घेऊन शक्य त्या मार्गाने मनोज जरांगे यांचं उपोषण थांबवून त्यांचा जीव वाचवणं गरजेचे आहे. त्यांना काही इजा झाली तर त्याला सर्वस्वी आजचं राज्य सरकार जबाबदार असेल, हे लक्षात ठेवा. आम्हा सर्वांचं या प्रयत्नांना सहकार्य असेल. कारण, मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर असला तरी तो त्यांच्या जीवापेक्षा मोठा नाही. हा प्रश्न आज ना उद्या सुटेल, नवं सरकार आल्यावर सुटेल. पण माझी जरांगे-पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी वैद्यकीय उपचार घेऊन उपोषण तात्काळ स्थगित करावे, 


राजेश टोपे मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला


राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांच्या तब्येतीची त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी केली. त्यानंतर मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती देखील केली. राजेश टोपे गेल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती फारच खालावत असल्याने आंदोलकांनी सहकाऱ्यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मध्यरात्री वैद्यकीय उपचार घेतले.


आणखी वाचा


फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, आता अन्याय सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देणार, जरांगे पाटलांचा इशारा