Vidhan Parishad Election 2022 : राज्यात सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच भाजपचे आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भाजपला विधान परिषद निवडणुकीत अंतर्गत कलहाचा फटका बसेल, असंही ते म्हणाले आहेत. विधान परिषद निवडणुकीपूर्वी नाना पटोले यांनी हा दावा केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली असल्याचं सांगण्यात येत आहे.


काय म्हणाले नाना पटोले?


विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले आहेत की, ''तीनही पक्षाचे समन्वय, अपक्ष आणि सर्व लहान लक्ष आमच्याशी जुळलेली आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात अंतगर्त कलह असून अनेक भाजप आमदार आमच्या संपर्कात आहेत.'' ते म्हणाले आहेत की, ''राज्यसभा निवडणूकीत काही चूका आमच्याकडून झाल्या होत्या, त्या यावेळी होणार नाहीत. राज्यसभेचा अनुभव मोठा आहे.''


तत्पूर्वी शनिवारी नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत विधानपरिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील आमदारांवर दबाव टाकण्यासाठी फोन करत आहेत.  याबाबत सगळी माहिती आमच्याकडे आहे. वेळ आली की ही माहिती समोर आणू. भाजपने कितीही अडथळे निर्माण केले तरी विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार विजयी होतील, असं ते म्हणाले होते. 


ते म्हणाले होते की, योग्य वेळ आल्यावर जनतेसमोर या गोष्टी मांडू. आमच्या हाती आलेल्या रेकॉर्डनुसार ईडी आणि सीबीआय यांचा दुरुपयोग कसा सुरु आहे हे निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला समजत आहे. भाजप सीबीआय आणि ईडीचा हत्यार म्हणून वापर करत आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवारी (20 जून 2022) मतदान होणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Vidhan Parishad Election : भाजपला ओव्हर कॉन्फिडन्स, पण त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार: रोहित पवार 
Vidhan Parishad Election Live : विधानपरिषद निवडणुकीचं रणांगण, वाचा प्रत्येक अपडेट