municipal corporation elections 2022: राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार औरंगाबाद महापालिका प्रशासनाने आगामी निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आणि अधिसूचना जाहीर केल्या आहे. मात्र महापालिकेचा हाच प्रारुप आराखडा वादात सापडला आहे. कारण आधी शिवसेना आणि आता भाजपने सुद्धा प्रारुप आराखड्यावर आक्षेप घेतला आहे. भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस समीर राजूरकर यांनी नव्याने आरखडा तयार करण्याची मागणी केली आहे. 


यापूर्वी शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आक्षेप घेत, महापालिकेचा गोपनिय प्रभाग प्रारुप आराखडा नव्याने करावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मुंबई येथे मुख्य निवडणूक आयुक्तांची खैरे यांनी भेट घेतली होती. यावेळी महापालिकेचा प्रभाग प्रारुप आराखडा सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे गोपनियतेचा भंग झाला असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे देखील उल्लघंन झाले असल्याचे खैरे यांनी म्हटले होते. त्यामुळे हा प्रारुप आराखडा रद्द करून नव्याने तयार करावा,असे देखील खैरे यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले होते. त्यांनतर गुरुवारपर्यंत 324 लोकांनी आक्षेप घेतला आहे. 


भाजपची मागणी...


खैरे यांच्यानंतर भाजपचे नेते राजूरकर यांनी प्रारुप आरखडा बदलण्याची मागणी करत आक्षेप घेतला आहे. आक्षेप नोंदवत राजूरकर यांनी म्हटले आहे की, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून प्रभाग रचना तयार करणे गरजेचे होते, पण राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली प्रभाग रचना करताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. दलित वस्ती, रहिवासी वस्त्यांचे जागोजागी विभाजन करण्यात आले. खाम नदी, सुखना नदी, राष्ट्रीय महामार्ग, नैसर्गिक हद्दींच्या अनेक ठिकाणी उल्लंघन झाले आहे. काही प्रभागात प्रगणक गटांचे विभाजन करण्यात आले आहे, ही बाब गंभीर आहे. नकाशा, व्याप्तीचा कुठेच ताळमेळ बसत नसल्याच राजूरकर यांनी म्हटले आहे.


शिवसेना नेत्यांची चिंता वाढली...


निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. यात अनेक हिंदू मतदार असलेले वार्ड तोडण्यात आले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडी तीन ठिकाणी विभागली गेली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका महानगरपालिका निवडणूकीत सहन करावी लागणार असल्याची चर्चा सेनेच्या गटात आहे. त्याचप्रमाणे भाजपला सुद्धा तीच भीती आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा MIM ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.