मुंबई: विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, त्यासाठी सर्व रणनीती तयार केली जात आहे असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितलं. राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपला ओव्हर कॉन्फिडन्स झाला आहे, पण त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असंही ते म्हणाले.
रोहित पवार म्हणाले की, "राज्यसभेच्या निवडणुकीतमध्ये अनपेक्षित फटका बसला, पण या निवडणुकीमध्ये आम्ही त्या संबंधी काळजी घेत आहोत. कुणाची विकेट पडेल हे उद्याच समजेल. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने वेगळी खेळी खेळली आणि निवडणूक जिंकली. पण भाजपला आता ओव्हर कॉन्फिडन्स झाला आहे, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल."
शिवसेना नाराज नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. ते म्हणाले की, "एखादी मॅच आपण हारतो, त्यातून आपल्याला शिकावं लागेल. आताही पीच तेच आहे, विरोधकही तेच आहे आणि भाजपकडून तोच दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला जाईल. या सर्वांची दखल आपण घेऊ. पण भाजप नक्कीच थर्ड अंपायरकडे जाऊ शकतात."
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर जाहीर आरोप केले, ते व्हायला नको होते. पण नंतर नाराजी दूर केली गेली, आमच्याकडे संवाद आहे असंही रोहित पवार म्हणाले.
विधानपरिषदेच्या रिंगणात पाच उमेदवार आहेत, त्यापैकी दुसरा किंवा तिसराही रन आऊट होऊ शकतो. रन आऊट कोणी होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं रोहित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेणार आहेत, तसेच ते अपक्षांसोबत संवाद साधणार आहेत.
राष्ट्रवादी-काँग्रेस मध्ये मतांसाठी चढाओढ?
या निवडणुकीमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीकडून छोट्या पक्षांची मते पदरात आपल्या पाडून घेण्यासाठी छोट्या पक्षांना फोन केलं जात आहे. काँग्रेस पक्षाची समाजवादी पक्षासोबत मतांसाठी तीन वेळा बैठक पार पडल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून मतं देण्यासाठी सातत्याने फोन येत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. समाजवादी पक्षासमोरं नेमकं कुणाला मत द्यावं याबाबात संभ्रम असल्याचंही समजतंय. मात्र यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.