Vasant More: वसंत मोरेंनी फेसबुकवर फोटो बदलला; बाळासाहेब, उद्धव-आदित्य ठाकरेंसोबत आणखी एका नेत्याला स्थान
Vasant More Pune: ठाकरे गटात प्रवेश करताच वसंत मोरेंनी त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरील कव्हर फोटो बदलला आहे.
Vasant More Pune: माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी मंगळवारी मुंबईत ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्री या निवासस्थानी त्यांना शिवबंधन बांधले. शिवसेना नेते संजय राऊत, आमदार सचिन अहिर यांच्याबरोबरच शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे हेही यावेळी उपस्थित होते.
पुन्हा शिवसेनेत परत आलो असून हा पक्षप्रवेश नसून आपल्याच पक्षात घरवापसी करत असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात बोलताना वसंत मोरेंना चिमटा काढला. शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काय मान-सन्मान मिळतो, कसा अपमान केला जातो, असे म्हणत मनसेकडून देण्यात आलेल्या वागणुकीवरुन अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
वसंत मोरेंनी फेसबुकवर फोटो बदलला-
ठाकरे गटात प्रवेश करताच वसंत मोरेंनी त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरील कव्हर फोटो बदलला आहे. विशेष म्हणजे या फोटमध्ये वसंत मोरेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांचाही फोटो ठेवला आहे
पावसासोबत वसंतही फुलला-
वसंत मोरेंची सुरुवात शिवसेनेतून झाली आहे, ते शिवसैनिक आहेत. त्यामुळे, ते शिवसेनेत येतील याची मला खात्री होती. बऱ्याच दिवसांनी पाऊस आला आहे, आणि पावसासोबत वसंतही फुलला आहे, असे संजय राऊत यांनी म्हणतात उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तर, आपल्याला एक चांगला शिवसैनिक मिळाला आहे, आपण सर्वांनी मिळून पुण्यातील शिवसेना वाढवुयात. तुम्हाला सामील करुन घेताना आम्हाला आनंद होत आहे, असे राऊत यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना मोठी जबाबदारी-
मी बरेच दिवसात पुण्यात आलो नाही, आता येईन तो शिवसैनिकांसाठी येईन. तेव्हा आपले सर्व शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांना बोलवा, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना केलं. पुण्यात एकेकाळी शिवसेनेचे 5 आमदार होते, तो काळ मला पुन्हा आणायचा आहे. पुणे हे पुन्हा मला भगवंमय करायचं आहे. त्यासाठी, मी तुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंसह मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांकडे पुण्यात शिवसेना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.
वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना मेसेज-
वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना मेसेज टाकल्याची माहिती दिली होती. 'साहेब मला माफ करा', असे त्या मेसेजमध्ये लिहिले होते. मला माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मला प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला होता, असे त्यांनी सांगितले होते. तसेच उद्धव ठाकरेंचा जो संघर्ष आहे, तो माझ्यासारख्या संघर्षातून आलेल्या कार्यकर्त्याला आकर्षित करतो. आपण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या सर्वांचा संघर्ष आपण जवळून पाहतोय. उद्धव ठाकरे जी जबाबदारी माझ्यावर सोपवतील, ती मी पार पाडेन, असेही वसंत मोरेंनी सांगितले होते.
संबंधित बातमी:
शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना मोठी जबाबदारी; मनसेलाही लगावला टोला