Uttar Pradesh election 2022 : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. याच दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि भाजपवर निशाणा साधला आहे. राकेश टिकैत यांनी उत्तर कोरियातील हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong un) याचा उल्लेख करत योगींना लक्ष केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''उत्तर प्रदेशच्या जनतेने ठरवायचं आहे त्यांना दुसरा किम जोंग उन हवा आहे का?'' शेतकरी आंदोलनाचा चेहरा ठरलेले राकेश टिकैत उत्तर प्रदेशची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच सातत्याने भाजपवर टीका करत आहेत.     


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करत राकेश टिकैत म्हणाले, ''लोकांना जनतेचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हवे आहेत, की उत्तर कोरियासारखी परिस्थिती हवी, हे लोकांनीच ठरवायचं आहे. आम्हाला कोणत्याच राज्यात हुकूमशाह सरकार नकोय.'' स्वतःच्या बुद्धीचा वापर करूनच मतदान करा, असे आव्हान टिकैत यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात ही राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमधील मुझफरनगर येथे भाजपवर लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी मोहीम चालवत असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, ''पश्चिम उत्तर प्रदेशाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे. हिंदू, मुस्लिम जिन्ना आणि धर्माच्या मुद्द्यावर मत मागणाऱ्यांना मत गमवावी लागतील.''  


ते पुढे म्हणाले की, शेतकरी विकास, वीज आणि पाणी या पायाभूत सुविधांसाठी अधिक चिंतीत आहे. राकेश टिकैत म्हणाले, ''मतदार त्याचंच समर्थन करतील जे शेतकरी विरोधी नाहीत. तसेच जे हिंदू आणि मुस्लिम मतदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत नाहीत.'' दरम्यान, उत्तर प्रदेशात एकूण सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्येच 10 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. तर 14 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तसेच येत्या 20 फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टप्प्यातील एकूण 59 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :