Shivraj Singh Chouhan Corona Positive : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कोरोना नियमांप्रमाणे ते विलगीकरणात राहणार आहेत. विलगीकरणात व्हर्च्युअल काम सुरुच ठेवणार आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी विलगीकरणात राहावे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करत सांगितले की, ‘माझी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करत विलगीकरणात राहणार आहे. यापुढील सर्व कामे व्हर्चुअल करेन...’ त्यासोबतच ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेय की, बुधवारी संत शिरोमणी रविदास जयंती कार्यक्रम आहे,याला व्हर्चुअली उपस्थित राहणार आहे.
देशात गेल्या 24 तासांत 27 हजार 409 नवे कोरोनाबाधित -भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग आता मंदावला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारांहून कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 27 हजार 409 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 347 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. तर आदल्या दिवशी कोरोनाचे 34 हजार 113 नवे रुग्ण आढळले होते आणि 346 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. चांगली गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत 82 हजार लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. यामुळे 55 हजार सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून देशात आतापर्यंत एकूण चार कोटी 26 लाख 92 हजार लोकांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 9 हजार 358 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 17 लाख 60 हजार लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांपेक्षा कमी आहे. एकूण 4 लाख 23 हजार 127 जणांना अजूनही कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.