Union Cabinet: केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांना नारळ देऊन संघटनेसाठी जुंपणार?
केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराचे वारे...मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना संघटनेची जबाबदारी दिली जाणार का? राजधानी दिल्लीत गेल्या दोन दिवसांतल्या घडामोडींमुळे या चर्चांना जोर धरला आहे.
नवी दिल्ली : लोकसभा 2024 (Loksabha Elctions 2024) ची निवडणूक जवळ येत आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्ताराचीही लगबग सुरु आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री 2024 साठी संघटनेच्या कामात जुंपले जाऊ शकतात. त्या दृष्टीनं दिल्लीत दोन दिवसांपासून घडामोडी सुरु आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराचे वारे...मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना संघटनेची जबाबदारी दिली जाणार का? राजधानी दिल्लीत गेल्या दोन दिवसांतल्या घडामोडींमुळे या चर्चांना जोर धरला आहे. निर्मला सीतारमण, ज्योतिरादित्य शिंदे, मनसुख मांडविया यांच्यासह जवळपास सहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून संघटनेत शिफ्ट केलं जाणार अशी शक्यता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं संघटना सक्रिय करण्यासाठी भाजप हा बदल करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. पंतप्रधान 13 जुलैला फ्रान्स दौऱ्यावर आहेत. त्याच्या आधी हा विस्तार होणार का याची उत्सुकता आहे. एक आठवड्यापूर्वी पंतप्रधान निवासस्थानी नड्डा, शाह, बी एल संतोष यांची दीर्घ बैठक झाली. पाठोपाठ अनेक मंत्री नड्डांना भेटायला जातायत. जे भेटायला जातायत त्यांना संघटनेत आणलं जाण्याची शक्यता आहे.चारच दिवसांपूर्वी भाजपनं संघटनेत काही बदल केले. चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले. त्यात केंद्रीय मंत्रिमंडळातले एक मंत्री जी किशन रेड्डी यांचाही समावेश होता. त्यांना तेलंगणा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. मंत्रिमंडळात असतानाच प्रदेशाध्यक्ष हे एक व्यक्ती एक जबाबदारी या भाजपच्या धोरणात बसत नाही. त्यामुळे विस्ताराची चर्चा जोर धरु लागलीय.
कुठल्या मंत्र्यांना संघटनेत जुंपलं जाणार?
- जे मंत्री नड्डांना भेटले त्यात काल ज्योतिरादित्य शिंदे यांचाही समावेश आहे.मध्य प्रदेशमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य यांना मध्यप्रदेशात पाठवलं जाणार का याची चर्चा
- शिवाय कर्नाटकमध्ये पराभूत झाल्यानंतर लोकसभेसाठी पडझड होऊ नये यासाठी प्रल्हाद जोशींना संघटनेत पाठवलं जाण्याची चर्चा
- निर्मला सीतारमण, गुजरातमधले मनसुख मांडविया या मंत्र्यांनाही संघटनेत आणलं जाण्याची शक्यता आहे
- सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात सर्व कॅबिनेट मंत्री भाजपचेच आहेत. त्यामुळे नव्या मित्रांना संधी देण्यासाठी काही मंत्र्यांना संघटनेत आणलं जाऊ शकतं.
- महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गट यांनाही त्यामुळे संधी मिळणार असं दिसतंय.
एकीकडे विरोधकांची एकी फोडण्यासाठी हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादीतल्या बंडानं त्याला मोठा झटका बसला आहेच. पण सोबत एनडीएतले मित्रपक्ष जोडण्याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. महाराष्ट्रात शिंदे, अजित पवार लोकसभेला भाजपसोबत असतीलच, तसेच पंजाबमध्ये अकाली दल, आंध्र प्रदेशात टीडीपी सारखे जुने मित्र भाजपसोबत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
भाजपनं संघटनेची जबाबदारी देताना आणखी एक मोठे संकेत दिलेत. पंजाबमध्ये सुनील जाखड, आंध्र प्रदेशात डी पुरंदरेश्वरी यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं आहे. हे दोघेही काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले. त्यामुळे बाहेरच्या नेत्यांनाही आता संघटनेत मोठी जबाबदारी मिळू शकते याचे संकेत भाजपनं दिले आहेत. यूपीपाठोपाठ महाराष्ट्र हे लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेलं राज्य आहे. त्यामुळे विस्तार करताना महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांचा गांभीर्यानं विचार केला जाईल हे उघड आहेत. त्याच दृष्टीनं महाराष्ट्राच्या वाट्याला किती मंत्रिपदं येतात, कुणाला डच्चू आणि कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागेल.