Central Government: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून केंद्र सरकारवर सातत्याने टीका होत आहे. विरोधी पक्षनेते हा मुद्दा रस्त्यावरून संसदेपर्यंत जोरदारपणे मांडत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा सरकारने तेलाच्या वाढत्या किमतींबाबत स्पष्टीकरण दिले आहे. भारतातील तेलाच्या किमती इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी वाढल्या असल्याचा दावा पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेत केला आहे.


तेलाच्या वाढत्या किमतींवरून सरकारचा बचाव करताना पेट्रोलियम मंत्री पुरी म्हणाले की, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात तेलाच्या किमती 1/10 ने वाढल्या आहेत. जर आपण एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत तेलाच्या किमतींची तुलना केली तर अमेरिकेत 51%, कॅनडामध्ये 52%, ब्रिटनमध्ये 55%, फ्रान्समध्ये 50%, स्पेनमध्ये 58% ने वाढ झाली आहे. पण भारतात किमती फक्त 5% वाढल्या आहेत.


संसदेत विरोधकांचा गदारोळ


पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किमतीवरून विरोधक सातत्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी या विषयावर संसदेत अनेकदा चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र चर्चा झाली नाही. त्यामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजावरही परिणाम होत आहे. महागाई आणि तेलाच्या किमतींबाबत विरोधी पक्षनेते सातत्याने घोषणाबाजी करत आहेत. यापूर्वी काँग्रेससह काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या आवारात यासंदर्भात निदर्शनेही केली होती. निवडणुकीपर्यंत सरकारने तेलाचे भाव वाढू दिले नाहीत आणि आता जनतेचे खिसे सातत्याने रिकामे केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.


गेल्या 15 दिवसांत 13 वेळा वाढल्या किमती 


पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. गेल्या 15 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 13 वेळा वाढ झाली आहे. दररोज काही पैशांची वाढ होत असून आतापर्यंत सुमारे 9.20 रुपयांची वाढ झाली आहे. सर्व प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने पुन्हा एकदा 100 चा टप्पा ओलांडला आहे. तर दुसरीकडे घरगुती एलपीजीच्या किमतीही वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरही परिणाम झाला आहे. 


संबंधित बातमी:  



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha