'काँग्रेसमुक्त भारत'च्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता 'काँग्रेसयुक्त भाजप', सामनातून टीकास्त्र
एकीकडे 'काँग्रेसमुक्त भारत' आणि दुसरीकडे 'शून्य विरोधीपक्ष', हीच मोदी गॅरेंटी, सामनातून टीकास्त्र
मुंबई : एकीकडे 'काँग्रेसमुक्त भारत' आणि दुसरीकडे 'शून्य विरोधी पक्ष' असे दुहेरी धोरण मोदी सरकार कसलीही चाड न बाळगता राबवीत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांतील आमदार-खासदारांची भाजपला आलेली सूज याच धोरणाचा परिणाम आहे. 'काँग्रेसमुक्त भारत'च्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता 'काँग्रेसयुक्त भाजप' होत असल्याच्या दारुण वास्तवाचीही जाणीव या मंडळींना राहिलेली नाही, असा हल्लाबोल सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आला आहे.
काँग्रेस सोडा आणि राज्यसभेत जा, हा सध्या भाजपचा मूलमंत्र बनला आहे आणि हीच मोदींची गॅरंटी बनली आहे. महाराष्ट्रातील अशोक चव्हाण आणि हिमाचल प्रदेशातील हर्ष महाजन हे काँग्रेसजन याच गॅरंटीचे लाभार्थी ठरले आहेत. 'काँग्रेसमुक्त भारत'च्या नादात वेडापिसा झालेला भाजप त्याच काँग्रेसशिवाय एक इंचही पुढे जाऊ शकत नाही, हेच पुन्हा सिद्ध झाले आहे, असेही अग्रलेखात म्हटलेय.
घोडेबाजाराला 'सरकारी कोंदण' मिळाले -
राज्यसभेच्या 15 जागांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेनुसार क्रॉस व्होटिंग झालेच. हे क्रॉस व्होटिंग किंवा घोडेबाजार भाजपकडून शंभर टक्के होणार ही खात्रीही खरी ठरली. उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये घोडेबाजाराच्या जोरावर भाजपने त्यांचा जास्तीचा एकेक उमेदवार निवडून आणला. उत्तर प्रदेशात त्याचा धक्का समाजवादी पार्टीला बसला. त्यांचे दोन उमेदवार निवडून आले, परंतु एकाचा पराभव झाला. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रख्यात वकील अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव हा जास्त धक्कादायक ठरला. राज्यात काँग्रेसची सत्ता आणि पुरेसे संख्याबळ असूनही सिंघवी भाजपच्या घोडेबाजारामुळे पराभूत झाले. समसमान मते पडल्यानंतर त्यांच्याच नावाची 'ईश्वरी चिठ्ठी' निघूनही नियमाचा फटका त्यांना बसला व भाजपचे हर्ष महाजन विजयी घोषित झाले. राज्यसभा निवडणुकीला क्रॉस व्होटिंग किंवा घोडेबाजाराची परंपरा जुनीच आहे. मात्र देशात मोदी राजवट आल्यापासून या घोडेबाजाराला 'सरकारी कोंदण' मिळाले आहे. लोकशाही मूल्ये, नीतिमत्ता, निवडणुकीचे संकेत आणि भाजप यांची फारकतच झाली आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षांत सर्वच निवडणुकांमध्ये भाजपवाल्यांचे 'घोडे' जास्तच उधळत आहेत. दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रातही हे घडले होते. आता उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात तेच घडले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठल्याही निवडणुकीत घोडे बाजार मांडायचा आणि विरोधी पक्षांमध्ये सेंध मारून आपले उमेदवार निवडून आणायचे. पुन्हा याला 'नव चाणक्यनीती' म्हणत स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची.
भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये 'स्वच्छ'
देशातील ज्या-ज्या राज्यांत काँग्रेसची पाळेमुळे आहेत, त्या-त्या राज्यांतील काँग्रेसची मंडळी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून 'स्वच्छ' केली जात आहेत. 'मागील दहा वर्षांत विरोधी पक्षांतील तब्बल 740 आमदार, खासदारांनी केवळ धाक आणि दबावापोटी भाजपमध्ये प्रवेश केला,' असा धक्कादायक दावा झारखंड मुक्ती मोर्चाचे एक पदाधिकारी सुप्रियो भट्टाचार्य यांनी गेल्याच आठवडय़ात केला. त्यातील सर्वाधिक आमदार, खासदार काँग्रेस पक्षाचे आहेत.