Maharashtra Politics : मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) निकालांमध्ये महाविकास आघाडीला (Maha Vikas Aaghadi) जनतेनं कौल दिला. तर, महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं. अशातच आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली असून तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांचे मेळावे, पक्षबांधणीसोबतच विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी आणि जागांची वाटाघाटी सुरू आहे. एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुतीत विधानसभेसाठी 80 जागा मिळाव्यात असं वक्तव्य केलं. तर, मनसेनंही थेट ठाकरेंवर हल्ला चढवत विधानसभा लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच, उद्धव ठाकरेंनीही स्वबळावर आगामी विधानसभा लढण्याची तयारी दाखवली आहे. 


महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. 2019 ते 2024 या काळात महाराष्ट्रात तीन सरकारं स्थापन झाली आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यानंतर महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील सरकार आणि आताचं महायुतीचं सरकार स्थापन झाल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं. तसेच, गेल्या दोन ते तीन वर्षांत महाराष्ट्रात अनेक मोठे भूंकप झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंसाठी यंदाची विधानसभा अस्तित्वाची लढाई आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.           


आगामी विधानसभा ठाकरे स्वबळावर लढणार? 


महाराष्ट्राच्या राजकारणाचा जुना इतिहास लक्षात घेता, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वांना सूचित केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि सांगलीच्या जागांवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली. 


दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेबाबत काँग्रेस आणि ठाकरे यांच्यात तणाव निर्माण झाला होता. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्निथला या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेस, पवार आणि ठाकरे यांच्यात उघड दुरावा आहे. याबाबत उद्धव ठाकरे आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत, असं बोललं जात आहे.