मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ घेतल्यामुळे राज्यात भाजपचे (BJP) नुकसान झाले असल्याचे खडेबोल संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गेनायजरमधून सुनावण्यात आले आहे. आरएसएसचे (RSS) सदस्य रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी मर्यादा पाळल्या नाहीत, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भाजपवर निशाणा साधला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि आरएसएसला डिवचले आहे.  


संजय राऊत म्हणाले की, आरएसएसचे मुख्यपत्र अनेक आहेत.  त्यांनी हे पण सांगितलं की सेना-भाजप युती तुटायला नव्हती पाहिजे. भाजपची मातृसंस्था आरएसएस होती. पण आता शीर्ष नेतृत्व भाजपचे काय म्हणताय सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रमध्ये सत्ता मिळवली हे लोकांना आवडले नाही. अशोक चव्हाण, अजित पवार यांना जेलमध्ये मोदी टाकणार होते ना? मग त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आणि घेतलं. 


अहंकाराच्या सर्व मर्यादा मोदी-शाहांनी तोडल्या


आरएसएसने भाजपला मोठे केले आहे. काल सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले लोकसेवकाला अहंकार असायला नको. पण अहंकाराच्या सर्व मर्यादा मोदी आणि शाह यांनी तोडल्या आहेत. मोदी आणि शाह यांच्या विरोधात भाजपचे नेते उठाव करतील का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


मोहन भागवत कुठे काश्मीर, मणिपूरमध्ये गेले?


आम्ही सामना मध्ये लिहितो आणि ॲक्शन सुद्धा घेतो. आरएसएसमध्ये असलेले गडकरी गप्प बसले आहेत. राजनाथ सिंहही आरएसएशी संबंधित आहेत. दोन तानाशाह देशात बसून ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचे लोक राज्य करत आहेत.  मोहन भागवत कुठे काश्मीर मणिपूरमध्ये गेले?  जर तुम्ही जात असाल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत. बोलून काय होणार तुम्ही नेतृत्व करा, आम्ही येऊ तुमच्या सोबत, असे म्हणत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. 


भाजपच्या मदतीने अजित पवारांची पत्नी राज्यसभेवर जाणार


सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार आहे. यावरून अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत. भाजप आणि अजित पवार त्यांना पाठवतील, मात्र आरएसएस काय करणार? अजित पवारांकडे सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवण्यासाठी मते कमी आहेत. त्यामुळे भाजपच्या मदतीने अजित पवारांची पत्नी राज्यसभेवर जाणार आहे. आरएसएस याचा विरोध करणार का? असे त्यांनी म्हटले. 


वंदना सूर्यवंशी सर्वात भ्रष्ट अधिकारी


अमोल किर्तीकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. तुमच्याकडून प्रयत्न सुरु आहेत की, तेथील सीसीटीव्ही मिळावा. मात्र सीसीटीव्ही मिळत नाहीये, असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जे चोर असतात ते सर्वात पहिले सीसीटीव्ही फुटेजची चोरी करतात. रिटर्निंग ऑफिसर (आरओ) वंदना सूर्यवंशी त्या सर्वात मोठ्या भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यांनी दिलेला निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली दिलेला आहे. चार महिन्यात परिवर्तन होणार आहे. त्यावेळी वंदना सूर्यवंशी कुठे जातील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 


आणखी वाचा 


मोठी बातमी : सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरुन अजित पवार गटात खडाखडी, छगन भुजबळ नाराज, 3 नेत्यांवर हल्ला!