उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, मोदींवरही जोरदार निशाणा
महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची आज परभणीत जाहीर सभा होती.
परभणी : मी संकटांशी झुंज देणार आहे, तुम्ही देणार आहात की नाही. मी पावसात भिजणार आहे, तुम्ही भिजणार आहात की नाही... असा सवाल करत शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्या भाषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आम्ही मावळे आहोत, आम्ही त्या संकटाला चिरडून टाकलं, मग हे संकट काहीच नाही. कारण, परभणी हा माझ्या शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला आहे. भाजपा आणि मिंध्यांना वाटतं की, सगळं काही पैशाने विकत घेता येतं. पण, परभणीकर हा पैशाने विकला जाणारा नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. तसेच, जय भवानी हा शब्द आपल्या प्रचार गीतामधून काढण्याचे निवडणूक आयोगाने (Election Commission) म्हटले. मात्र, मी तो शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात करताच, पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी, लोकांनी पावसात भिजून सभा ऐकली. तर, उद्धव ठाकरेही पावसात भिजल्याचं दिसून आलं.
महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांची आज परभणीत जाहीर सभा होती. यावेळी, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही प्रेमाने आलात तेव्हा आम्ही मिठी दिली होती, पण आता माझी वाघनखेर बाहेर आली आहेत, अशा शब्दात भाजपाला इशारा दिला. यावेळी, सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील जाहीर सभेत, मोदींसमोरील सभेत बहिण-भावाच्या नात्याबद्दल विचित्र बोलले. महिलांचा अवमान करण्याचं काम या नेत्यांकडून होत आहे. यापूर्वीही सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना मराठवाड्यातील एका मंत्र्याने शिवी दिली होती. मात्र, मोदी-शाह यावर काहीही बोलायला तयार नाही. महिलांचा अपमान चालेल, पण आम्हाला मतं द्या, हीच त्यांची भूमिका आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
जानकरांचं डिपॉझिट जप्त करा
मला माझ्या आई-वडिलांचा अभिमान आहे, मी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मिनाताईंचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे. तुम्ही आमच्या घराणेशाहीवर बोलता, तेव्हा आमची ही जनता ठरवेल. पण, तुमच्या एकाधिकारशाहीवर बोलतो, आणि बोलणारच.. असे म्हणत ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. अब की बार, भाजपा तडीपार करायची आहे. कारण, हे आपला महाराष्ट्र लुटत आहेत, आपले उद्योग पळवून नेत आहेत. त्यामुळे, बंडु जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त करा, असे म्हणत महादेव जानकरांचं डिपॉझिट जप्त करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी परभणीतील सभेतून केलं. यावेळी, भरपावसात परभणीकरांनी सभा ऐकली, तर उद्धव ठाकरेंनीही भरपावसात आपलं भाषण पूर्ण केलं. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून केंद्रातील मोदी सरकार आणि मोदी-शाह यांच्यावर ठाकरे शैलीत हल्लाबोल केला.