Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis: माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (17 डिसेंबर) नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलं. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई उपस्थित होते. नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे काल नागपुरात दाखल झाले होते. ठाकरे गटाच्या आमदारांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. दरम्यान काल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आजच्या सामना अग्रलेखात मंत्रिमंडळ झाले, रडारड सुरुच...असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
सामना अग्रलेखात नेमकं या म्हटलंय?
राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ अखेर बनले, पण रडारड संपलेली नाही. नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही. कोणी कितीही आपटली व अश्रू ढाळले तरी ईव्हीएम बहुमताच्या जोरावर सरकार मजबूत आहे. त्यामुळे नवीन मंत्री सध्या बिनखात्याचे असले तरी कारभार रेटून नेला जाईल. भविष्यात शिंदे व अजित पवार निस्तेज होतील आणि काही आदळआपट करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दारात' ईडी' च्या चौक्या कायमच्या लावल्या जातील...महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण या पद्धतीने...
...पण आता त्याच फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड आहेत-
महाराष्ट्राच्या नशिबी जे ईव्हीएमचे सरकार आले, ते नक्की कोणत्या मुहूर्तावर? फडणवीसांचे सरकार असल्यामुळे मुहूर्त हा काढलाच असणार व त्यात काही चुकीचे नाही, पण आधी बहुमत असूनही सरकार बनत नव्हते. रुसवे, फुगवे, रागालोभाने शपथविधी लांबला व आता चाळीसेक जणांचा शपथविधी होऊनही सरकारात सुखशांती दिसत नाही. नाराजांनी उघडपणे आपला अंगार बाहेर काढला आहे. त्या अंगाराच्या कितीही ठिणग्या उडाल्या तरी सरकारला चटके बसणार नाहीत. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशिवाय सरकार रेटून नेण्याइतपत बळ भाजपकडे आहे आणि कमी पडलेच तर दोन्ही मित्रपक्ष फोडून बहुमताचा आकडा जुळविण्यासाठी ईडी, सीबीआय, पोलीस फोर्स आहेच. नागपुरात रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. दिल्लीहून याद्या मंजूर होऊन आल्यावर मंत्र्यांनी शपथ घेतली. स्वाभिमान वगैरेसाठी ज्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोडली अशा शिंदे-अजित पवार गटांच्या याद्याही दिल्लीत अमित शहांच्या नजरेखालून मंजूर होऊन आल्या व त्यानुसार मंत्र्यांच्या शपथग्रहणाचा कार्यक्रम पार पडला. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण अशा प्रमुख नेत्यांना वगळले आहे. तानाजी सावंत, दीपक केसरकर यांना दिल्लीच्या आदेशाने नारळ देण्यात आला , पण संशयास्पद मृत्यू झालेल्या पूजा चव्हाण प्रकरणातील मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाची शपथ दिल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचे लाडक्या बहिणींवरचे प्रेम म्हणजे ढोंग आहे हे सिद्ध झाले. पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीस यांची भूमिकाही 'आपटाआपटी'ची होती. राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले होते, पण आता त्याच फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड आहेत.
अजित पवार, हसन मुश्रीफ यांना फडणवीस 'चक्की पिसायला' पाठवणार होते-
अजित पवार, हसन मुश्रीफ यांना फडणवीस 'चक्की पिसायला' पाठवणार होते. स्वतः पंतप्रधान मोदी यांचीच तशी इच्छा होती. हे दोघेही आता महाराष्ट्र बळकट करण्यासाठी फडणवीसांना मदत करतील. बीडमध्ये हिंसाचार, रक्तपात, खुनाखुनी, खंडणीखोरीचा कहर उडाला आहे. सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे. सोबत पंकजा मुंडे यांनाही संधी मिळाली. गणेश नाईक हे भाजपच्या कोट्यातून मंत्री झाले. त्यांचे चिरंजीव संदीप नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निवडणूक लढले होते. शिंदे गटातून अनेकांचे तीन वर्षांपासून टांगलेले कोट या वेळी अंगावर चढले, पण त्या गटातील अनेकांची तडफड ही मनोरंजन करणारी आहे. नितेश राणे, इंद्रनील नाईक, आदिती तटकरे, आकाश फुंडकर, शंभूराजे देसाई, शिवेंद्रराजे भोसले, अतुल सावे, जयकुमार रावल, मेघना बोर्डीकर, भरणेमामा, मकरंद पाटील, बावनकुळे, प्रताप सरनाईक, दादा भुसे अशी मंडळी मंत्रीपदावर विराजमान झाली. एकंदरीत घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांनी आपापल्या गटातील घराणेशाहीचा 'मान' राखला हे स्पष्ट दिसते. अजित पवार, एकनाथ शिंदे वगैरे गटांत जमलेले लोक हे निव्वळ स्वार्थासाठी जमलेल्यांचा गोतावळा आहे. ठेकेदारी, कारखानदारी व जमल्यास मंत्रीपद किंवा एखादे महामंडळ मिळाले तर बोनस, अशा मनोधारणेचे हे लोक आहेत. विचार, भूमिका वगैरेंच्या बाबतीत ठणठण गोपाळा आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपसह शिंदे आणि अजित पवार गटांतून नाराजांची खदखद बाहेर पडत आहे. छगन भुजबळ यांनीही उघड नाराजी व्यक्त केली.
भुजबळांना पुढे करून फडणवीस यांनी त्यांची जरांगेंविरुद्धची लढाई खेळली-
मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी टोकाचा पंगा घेतला, हे भांडण भुजबळ यांनी इतके शिगेला नेले की, विधानसभेत जिंकूनही जरांगे व मराठा समाजाला दुखवायचे नाही या एका कारणासाठी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. भुजबळांना पुढे करून फडणवीस यांनी त्यांची जरांगेंविरुद्धची लढाई खेळली. आता भुजबळांना वाऱ्यावर सोडले. वापरले आणि फेकून दिले. भुजबळांनी ज्या पद्धतीने शरद पवारांना सोडले त्याची फळे ते भोगत आहेत. सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण यांचे नेमके काय झाले ते दिल्लीलाच माहीत. "माझे नाव शेवटपर्यंत यादीत होते हो!" असा दावा सुधीर मुनगंटीवार करतात. मग त्यांचे नाव कोणी कसे वगळले? त्यांच्या नावावरच्या शाईवर कोणी पाणी शिंपडले काय? बाकी बिल्डर मंगलप्रभात लोढा यांची वर्णी लागली. ती लागली नसती तर भाजपच्या 'शेठजी' परंपरेस धक्का बसला असता. मुंबईतून आशिष शेलार यांना संधी मिळाली. हा एका कार्यकर्त्याचा सन्मान आहे. राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ अखेर बनले, पण रडारड संपलेली नाही. प्रकाश सुर्वे, लाड, दरेकर, राम शिंदे, शिवतारे अशा अनेकांना हुंदके फुटले आहेत. अशा नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही. कोणी कितीही आपटली व अश्रू ढाळले तरी ईव्हीएम बहुमताच्या जोरावर सरकार मजबूत आहे. त्यामुळे नवीन मंत्री सध्या बिनखात्याचे असले तरी कारभार रेटून नेला जाईल. भविष्यात शिंदे व अजित पवार निस्तेज होतील आणि काही आदळआपट करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दारात 'ईडी'च्या चौक्या कायमच्या लावल्या जातीला महाराष्ट्र आता थांबणार नाही...असं सामनाच्या अग्रलेखातमध्ये म्हटलं आहे.