मुंबई : गेल्याच आठवड्यात दारुच्या नशेने बस चालवून निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणभूत ठरल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होता. त्यानंतर, मुंबईतील बेस्ट प्रशासनाने देखील या घटनेची गंभीर दखल घेत कारवाई केली व काही सूचनाही दिल्या आहेत. आता, दारुच्या नशेत बस चालवणाऱ्या चालक आणि वाहकाला अंधेरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबईत (Mumbai) काही दिवसांआधी कुर्ल्यात बेस्ट बसचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये 9 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले होते. या अपघाताला काही दिवस उलटले असताना आता पुन्हा एक भयावह प्रकार समोर आला आहे. साकीनाका येथील योगीराज श्रीकृष्णा शाळेतील 50 मुलांना बोरिवली गोराईमध्ये पिकनिकसाठी घेऊन जाणाऱ्या खासगी बसचालक आणि क्लीनरने दारुच्या नशेत बस (Bus Driver) चालवतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


साकीनाका योगीराज शाळेचा मुलांसाठी आज पिकनिक टूर आयोजित करण्यात आली होती. शाळेच्या मुलांना पिकनिकला घेऊन जाणारा खासगी बस चालक आणि क्लीनर दारूच्या नशेत अंधेरी कुर्ला रोडवर पश्चिम द्रुतगती मेट्रो स्टेशनजवळ विचित्रपणे बस चालवत असताना आढळून आले. यावेळी, येथील वाहतूक पोलिसांनी तत्काळ बस थांबवली. वाहतूक पोलिसांचे पोलीस शिपाई मोहन पवार, गणेश भगत आणि मोहाले यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, शाळेच्या सर्व मुलांचा आणि टीचरचा जीव सुरक्षितपणे वाचला. मात्र, बसचालक आणि क्लिनरचा या कारनामामुळे शाळेमध्ये शिकणारा मुलांचा पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे. तसेच, मुलांच्या सुरक्षेला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 


दरम्यान, अंधेरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 281,125 आणि मोटार वाहन कायदा 184,185 चा अंतर्गत बस चालक आणि वाहक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. मात्र, मुंबई शहरात मागील काही दिवसापासून बेस्ट बस चालकाचा दारूच्या व्हिडिओ व्हायरल होत असताना खासगी बस चालकाकडून देखील दारूचे नशेत बस चालवतानाची घटना समोर आल्यामुळे मुंबईकरांचा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसचे स्टेअरिंगही सुरक्षित हाती नसल्याने काळजी व्यक्त होत आहे. त्यामुळे, शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील बसच्या ड्रायव्हरची आणि बसचालकाशी निगडीत सर्व बाबींची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. 


हेही वाचा


विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही