(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी: ठाकरेंचा आणखी एक आमदार फुटणार, एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक?
Mumbai News: शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाला लागलेल्या गळतीचे सत्र अद्याप सुरुच आहे. लवकरच ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई: एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा मोठा गट फोडून शिवसेना पक्ष हिसकावून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची सुरु झालेली पडझड अद्याप थांबलेली नाही. अशातच ठाकरे गटाचा आणखी एक आमदार फुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेला होता. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या ५६ आमदारांपैकी केवळ १५ आमदारच उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबले होते. मात्र, आता यापैकी आणखी एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या या आमदाराची काही दिवसांपूर्वीच गुप्त बैठक पार पडल्याचे समजते. यावेळी संबंधित आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाला आणखी एक खिंडार पडण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसांमध्ये ठाकरे गटाचा हा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करु शकतो. संबंधित आमदाराने एकनाथ शिंदे यांना तसा शब्द दिला आहे. आम्ही मुळचे शिवसैनिक आहोत, धनुष्यबाणाचे पाईक आहोत.त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, असे संबंधित आमदाराने एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे समजते. या आमदारासोबत ठाकरे गटाचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, शिंदे गटाच्या वाटेवर असणारा हा आमदार नेमका कोण?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या राजकीय वर्तुळात याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
ठाकरे गटात उरलेले १५ आमदार कोण?
* आदित्य ठाकरे
* सुनील राऊत
* नितीन देशमुख
* कैलास पाटील
* राहुल पाटील
* अजय चौधरी
* सुनील प्रभू
* उदयसिंग राजपुत
* रमेश कोरगावकर
* रवींद्र वायकर
* संजय पोतनीस
* प्रकाश फापर्तेकर
* भास्कर जाधव
* राजन साळवी
* ऋतुजा लटके