Kiran Mane: वसंत तात्या हृदय तुम्हाला, पण मत रवींद्र धंगेकरांना; ठाकरेंचा शिवसैनिक किरण मानेंची पोस्ट व्हायरल
Maharashtra Politics: सध्याच्या काळात एखाद्या राजकारण्याने प्रतिस्पर्धी पक्षातील नेत्याचे कौतुक करण्याचा प्रसंग फार कमीवेळा अनुभवायला मिळतो. किरण माने यांनी वसंत मोरे उर्फ तात्या यांचे कौतुक करणारी पोस्ट लिहली आहे.
पुणे: सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर टीका-प्रतिटीका,आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मात्र, ठाकरे गटाच्या किरण माने (Kiran Mane) यांनी पुण्यातील फायरब्रँड नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांचे कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे. वसंत मोरे हे पुण्यातील महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे किरण माने यांनी अचानक त्यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वसंत मोरे हे मनाला भावले असले तरी पुण्यातून रवींद्र धंगेकरच (Ravindra Dhangekar) निवडून यावेत, ही माझी इच्छा असल्याचेही किरण माने यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
किरण माने यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
बरेच दिवस यावर बोलायचे होते. बाकी काही का असेना वसंत मोरे या नेत्याची ही वृत्ती माझ्या मनाला भावली. आधी एक सांगतो...पुण्यातून रविंद्र धंगेकरच निवडून यावेत ही माझी इच्छा आहे.मला वेगळं बोलायचंय.
कुठलाही नेता पक्ष सोडतो आणि दुसर्या पक्षात जातो... हे त्याचं संवैधानिक स्वातंत्र्य असतं. मतभेद होतात. काही मजबुरी असते किंवा राजकीय स्वार्थही असतात... वेगळं व्हावं लागतं. पण हे करताना, पुर्वी आपण ज्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलाय... तिथल्या वरिष्ठांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला वेळोवेळी उमेदवारी दिली... अनेक महत्त्वाची पदं दिली... आपल्याला मोठं केलं... नांव दिलं... पैसा दिला... समृद्धी दिली... त्या वरीष्ठांशी राजकीय नातं तोडलं तरी माणसात 'कृतज्ञता' नांवाची एक गोष्ट असते... ती टिकवली तरच त्या नेत्याचे चारित्र्य दिसते. त्याच्यावरचे संस्कार दिसतात. 'माणूस' म्हणून तो विश्वासार्ह ठरतो. राजकारणी म्हणून नीतीवान सिद्ध होतो.
जे नेते पक्ष सोडल्या-सोडल्या वरिष्ठांची निंदानालस्ती सुरू करतात... दोषारोप सुरू करतात... पुर्वी आपण ज्या नेत्यांच्या पाया पडत होतो... आदराने झुकत होतो... त्यांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानास्पद शब्दांत हेटाळणी करतात... ते खरंतर स्वत:ची लायकी दाखवतात. टीका करताना वयाचाही मान ठेवत नाहीत. आपल्यावर केलेल्या उपकारांची जाण ठेवत नाहीत. 'माणूस' म्हणूनही असे लोक नीच असतात. राजकारणी म्हणून अत्यंत चारित्र्यहीन, निर्लज्ज असतात. ते कुणाचेच नसतात. ना स्वत:च्या कार्यकर्त्यांचे-ना जनतेचे. हल्ली अशा बेईमानी पिलावळीचा उच्छाद सुरू आहे राजकारणात.
म्हणून या दलदलीत वसंत मोरेंसारखा राजकारणी लक्ष वेधून घेतो. मनाला भावतो. पक्ष सोडताना राज ठाकरेजींच्या फोटोला साष्टांग नमस्कार करून पक्ष सोडला. नंतरही दोषारोप नाहीत. राज ठाकरेंनाही मी त्याबाबतीत मानतो. त्यांनीही कधी बाळासाहेबांची निंदा केली नाही. पवारसाहेबांना सोडून गेलेल्या सुशिलकुमार शिंदेंनीही कायम जाण ठेवली की मी जो आहे तो पवारसाहेबांनी मला राजकारणात आणलं म्हणून... किंवा विजयसिंह मोहिते पाटलांनी कधी पवारसाहेबांची पातळी सोडून नालस्ती केली नाही. याला म्हणतात राजकारणातला 'माणूस'.
वसंतराव मोरे, तुम्ही तोच माणूसकीचा आदर्श जपलात. हे पहा, आमचा पाठिंबा कायम धंगेकरांना राहील. ते ही तुमच्यासारखेच 'माणूसपण' जपणारे आणि म्हणूनच सर्वसामान्यांची जाण असणारे उमदे नेते आहेत. पण पक्ष सोडताना तुम्ही केलेल्या या आदर्श कृतीबद्बल सलाम वसंतराव... मनापासून सलाम.
- किरण माने.
...बरेच दिवस यावर बोलायचे होते. बाकी काही का असेना वसंत मोरे या नेत्याची ही वृत्ती माझ्या मनाला भावली. आधी एक सांगतो...पुण्यातून रविंद्र धंगेकरच निवडून यावेत ही माझी इच्छा आहे.
— Kiran Mane (@kiranmane7777) April 17, 2024
मला वेगळं बोलायचंय.
कुठलाही नेता पक्ष सोडतो आणि दुसर्या पक्षात जातो... हे त्याचं संवैधानिक… pic.twitter.com/GRreTuRr0O
आणखी वाचा