(Source: Poll of Polls)
Tejas Thackeray : अनंत-राधिकाच्या संगीतमध्ये तेजस ठाकरेंचा डान्स, विरोधकांकडून आरोपांचा ठेका; आदित्य ठाकरेंचा पलटवार
Anant Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या संगीत कार्यक्रमाला उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी तेजस ठाकरे यांनी केलेला डान्स सध्या व्हायरल होत आहे.
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्यासोबत स्टेजवर ठेका धरलेली व्यक्ती तुम्हाला कदाचित ओळखू येणार नाही. तुम्ही कदाचित त्यांना ओळखू शकणार नाही, असं आम्ही म्हणतोय कारण ते प्रसिद्धी आणि कॅमेऱ्यापासून सहसा लांब राहतात. त्यांचं नाव आहे तेजस ठाकरे. संपूर्ण नाव तेजस उद्धव ठाकरे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ते कनिष्ठ चिरंजीव.
तेजस ठाकरेंचा डान्स, विरोधकांकडून आरोपांचा ठेका
गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाहानिमित्त विविध सोहळे संपन्न होत आहेत. याच सोहळ्यातील संगीत कार्यक्रमाला उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. त्यावेळी अनेक सेलिब्रिटींसोबत तेजस ठाकरे यांनी खास डान्स करत ठेका धरला आणि उपस्थितांची मनं जिंकली. तेज ठाकरेंच्या डान्सचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यावर तोंडसुख घेतलं.
आशीष शेलारांची टीका
"जो मराठी तरुण "गोविंदा रे गोपाळा" म्हणत दहीहंडीत नाचताना कधी दिसला नाही, ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत थिरकले नाहीत, ज्याने गणा धाव रे... मला पाव रे... म्हणत जाखडी नृत्य केलं नाही, तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत नाचताना दिसला...! आणि मराठी माणसाच्या काळजात धकधक झाले. असो.. हे नृत्य कसे जगविख्यात, जीवनावश्यक...वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे "संजयकाका" महाराष्ट्राला पटवून देतीलच...! ", असं ट्वीट भाजप नेते आशिष शेलार यांनी केलंय.
टीकाकारांवर आदित्य ठाकरेंचा पलटवार
अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या सोहळ्यात तेजस ठाकरे यांनी केलेल्या डान्सवरून चर्चा रंगलेल्या असतानाच, विरोधकांनी आरोपांचा ठेका धरत ठाकरेंना चांगलेच चिमटे काढले आहेत. आशिष शेलारांनी तेजस ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवत ठाकरे आणि संजय राऊतांना चिमटे काढल्यानंतर नितेश राणेंनीही शेलक्या भाषेत टीका केली आणि त्याला आदित्य ठाकरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आमचे कौटुंबिक संबंध आहेत, टीका करणाऱ्यांच्या डोक्यावर उपचार करायला हवेत, असं म्हणत आदित्य ठाकरेंचा पलटवार केला आहे.