वर्धा : राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भूमिका महाराष्ट्रातली जनतेला निश्चितपणे पटणारी नाही, त्यांचा मोदींना (PM Modi) पाठींबा आमचा विश्वास वाढवणारा आहे, असं म्हणत ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर जोरदार निशाणा डागला आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी खोचक टीकाही केली आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्याचं जाहीर केलं. पंतप्रधान मोदींसाठी पाठींबा देत असल्याचं राज ठाकरे म्हणाले, यानंतर ठाकरे गटाने मनसेवर टीकास्त्र डागलं आहे.


महाराष्ट्रातली जनतेला ही भूमिका निश्चितपणे पटणारी नाही


मला प्रश्न विचारायचा होता की, एकीकडे राजकीय व्याभीचाराला समर्थन नाही, असं म्हणताना तुम्ही ज्यांनी वाया सुरत-गुवाहाटी करत अत्यंत कूटनीतीने आणि अक्षरशः खोक्यांचं राजकारण करत इथे सरकार बदललं, अशांना पाठिंबा देता. एकीकडे तुम्ही विचारांची भाषा करता आणि दुसरीकडे विचार बदलून टाकता. महाराष्ट्रातली जनता, जो कोणी संविधान प्रेमी आहे, त्याला ही भूमिका निश्चितपणे पटणारी नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.


राज ठाकरेंचा मोदींना पाठींबा आमचा विश्वास वाढवणारा


राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, त्यांच्या व्याख्यानाचा आमच्यावर काही परिणाम होईल आणि खचून जाऊ वगैरे असं काहीच नाही. उलट मला असं वाटतं की, हा पाठिंबा आमचा विश्वास वाढवणारा आहे की, ज्या अर्थ एवढे सगळे लोक एका 84 वर्ष झालेला आणि एका अत्यंत घायाळ वाघाला हरवण्यासाठी एवढे सगळे ताकद लावतात, त्या अर्थी त्यांना अजूनही महाराष्ट्रात स्वतःबद्दल खात्री वाटत नाहीय, की आपण जिंकू शकतो.


सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका


सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, काय मला काही माहीत नाही दादा, काय झालं की, हे सगळं चालू होतं, तेव्हा मी म्हणींचं पुस्तक वाचत होते. मला कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी काहीतरी म्हण आहे, त्याचा अर्थ मी शोधत होते, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.


स्वतःच्या मुलाचीही उमेदवारी जाहीर करण्याचंही भाग्य मिळू नये


शिंदेंचे असली शिवसेना असती तर, असली शिवसेनेने, जी आम्ही पत्रकारांनी विचारल्याबरोबर उमेदवारांची यादी धारदार वाचून दाखवली, तसे आपले उमेदवार घोषित केले असते. पण ज्या माणसाला स्वतःच्या मुलाचीही उमेदवारी जाहीर करण्याचं भाग्य मिळू नये, त्यांच्याबद्दल आम्ही असली आणि नकली वाद घालायची गरजच नाही हे उत्तर आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.


सुषमा अंधारेंचा सुधीर मुनगंटीवारांवर निशाणा


चंद्रपूर येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांबाबत आपत्तीजनक वक्तव्य केले. यानंतर भाजप आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागत सुषमा अंधारे म्हणाल्या, मला असं वाटतं की, सुधीर मुनगंटीवार असतील किंवा एकूण भाजपातील लोक असतील, हे सगळे लोक त्यांचा जो मूळ संस्कार आहे, त्यांचा जो मूळ पिंड आहे, तो दाखवत आहेत. त्यांचा जिथे स्टेटमेंट आहे, मंगळवारच्या सभेमध्ये त्यांनी केलेलं हे वक्तव्य हे भाजपच्या मूळ संस्कृतीचं खरं प्रदर्शन आहे.