मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार, या सर्वांना पडलेल्या प्रश्नाचा अखेर उलगडा झाला आहे. शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. सध्याच्या घडीला देशाला एका खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. हे नेतृत्त्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आहेत. त्यामुळे फक्त त्यांच्यासाठी मी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे यांनी ही महत्त्वाची घोषणा करण्यापूर्वी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक आणि डॉक्टरांना जुंपणे कशाप्रकारे योग्य नाही, हे त्यांनी सांगितले. मी शिवसेना पक्ष कसा सोडला, त्यानंतर स्वत:चाच पक्ष स्थापन का केला, या मुद्द्यांचा राज ठाकरे यांनी सविस्तरपणे उहापोह केला. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात सध्या कशाप्रकारे राजकीय व्यभिचार सुरु आहे, मनसे पक्ष या सर्वांपेक्षा कसा वेगळा आहे? मला या सगळ्यात पडायचे नाही. त्यामुळे आपण महायुतीसोबत जागावाटपाच्या चर्चेत भागच घेतला नाही, हे राज ठाकरे यांनी सांगितले. एकूणच राज ठाकरे यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली.
मात्र, या सगळ्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगता आली नाही किंवा त्यांनी जाणीवपूर्वक त्याविषयी बोलणे टाळले. ती गोष्ट म्हणजे राज ठाकरे हे दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले होते, तेव्हा नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, 'आपण एकत्रं येऊन काहीतरी केलं पाहिजे', असं सतत मला सांगत होते. हे मी वर्ष-दीड वर्षे ऐकत होतो. आपल्याला एकत्रं यायचं म्हणजे काय, या प्रश्नानं उत्तर कोणीही देत नव्हते. ते विचारल्यानंतर हे सगळे विषय निघाले. मग मी शेवटी एक काम केलं. मी अमित शाह यांना फोन केला. मी त्यांना म्हटलं की, मला जरा तुम्हाला भेटायचं आहे, हे सगळं काय चाललंय मला कळत नाही. एकदा तुमच्याशी बोलून मला या सगळ्यांचं म्हणणं समजून घ्यायचं आहे. मग तिकडे आमचं बोलणं झालं, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत काय झालं, हे मात्र राज ठाकरे यांनी सांगितले नाही. त्यामुळे दिल्लीतील राज ठाकरे-अमित शाह यांच्या भेटीत नक्की काय बोलणं झाली होती? याचा तपशील समोर येऊ शकला नाही.
सलग तिसऱ्या निवडणुकीत मनसेने लोकसभा निवडणुकीत उमेदवारच उतरवले नाहीत
राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार रिंगणात नसेल, हे स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे यांनी 2009 मध्ये शेवटची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2014, 2019 आणि आता 2024 अशा तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेने उमेदवार उतरवण्याऐवजी एखाद्या नेत्याला किंवा राजकीय पक्षाला बाहेरून पाठिंबा देणे पसंत केले आहे.
आणखी वाचा